परराष्ट्र खात्यानं चीनला तीव्र शब्दात सुनावलं, चिनी सैन्याचा हल्ला नियोजित कट
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील तणावाची सध्याची स्थिती कमी करण्यावर एकमत दर्शवलं आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये लदाखच्या गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक झडप आणि सीमा वाद यावर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली आहे. परराष्ट्र खात्यानं चीनला तीव्र शब्दात सुनावलं आहे. गलवान व्हॅलीमध्ये जे काही झालं, तो पूर्वनियोजित आणि रणनिती आखून झालेलं आहे. भविष्यात जे काही घडेल ते त्याला चीनच जबाबदार असेल, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.
परराष्ट्र खात्यानं चीनला तीव्र शब्दात सुनावलं
गलवान खोऱ्यात 15 तारखेला चीनकडून झालेल्या हिंसक झटापटीबाबत परराष्ट्र खात्यानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 6 जूनला कमांडर पातळीच्या अधिकाऱ्यांमध्ये दीर्घ बैठक झाली. ज्यात लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोलवरुन सैन्य मागे घेण्यावर एकमत झालं होतं. गेल्या आठवड्यात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी सीमेवर असलेले कमांडर नियमितपणे भेटत होते. त्यात थोडी प्रगती होत असतानाच चिनी सैन्याने लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोलवर भारताच्या सीमेत बांधकाम उभं करण्याची तयारी सुरु केली. त्यामुळे वाद विकोपाला गेला, त्यानंतर चिनी सैन्यानं नियोजितपणे कट करुन हल्ला केला, त्याचा परिणाम म्हणून हिंसा झाली आणि काही जणांचे जीव गेले
दोन्ही बाजूंनी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चीननं त्याचं उल्लंघन केलं. तसंच ही कृती जमिनीवरची सत्य आणि सद्यस्थिती बदलण्याच्या उद्देशानं केल्याचं दिसतंय. आम्ही हे आधोरेखित करु इच्छितो की सध्याची अभूतपूर्व परिस्थिती दोन्ही देशांतील संबंधांवर गंभीर परिणाम करणारी आहे. चीननं तातडीनं स्वत: केलेल्या कृत्याचा पुन्हा आढावा घेऊन, पुनर्विचार करुन त्यात सुधारणा दर्शवणारी कृती करावी. 6 जूनला कमांडर्सच्या द्विपक्षीय बैठकीत ठरलेल्या गोष्टींची दोन्ही बाजूंच्या सैन्यानं गांभीर्यानं अंमलबजावणी करावी. दोन्ही बाजूचं सैन्य त्या कराराशी आणि शिष्टाचाराशी बांधील आहे. सैन्यानं कराराचा आदर करुन लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोल आणि परिसरात कुठलीही एकतर्फी कृती घडणार नाही याची काळजी घ्यावी.
दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, दोन्ही देशांनी भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या शिखर चर्चेत ज्या बाबी एकमताने ठरल्या आहेत, त्याचा दोन्ही देशांनी आदर करावा, असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी जयशंकर यांना सांगितलं. सध्या आस्तित्वात असलेल्या मार्गानेच दोन्ही देशांनी परस्पर संवाद वाढवावा असंही वांग यांनी सांगितलं.
- India-China Face Off | चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद
- India-China Face Off | कर्नल संतोष बाबूंसह 20 जवान शहीद; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
- India-China Border Dispute | चीनने LAC ची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला : पराराष्ट्र मंत्रालय
- IndiavsChina | तब्बल 45 वर्षानंतर भारत चीन सीमेवर रक्त सांडलं, महिनाभरापासून धुमसत्या वादाचा स्फोट
- India-China Face Off | जवानांच्या बलिदानाचं दु:ख शब्दात व्यक्त करु शकत नाही : राहुल गांधी
India-China Face Off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम : पंतप्रधान