Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह! आज पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन, तर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी करणार ध्वजवंदन
Independence Day 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करतील. तर मुख्यमंत्री ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील.
![Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह! आज पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन, तर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी करणार ध्वजवंदन Independence Day 2022 marathi news occasion of Independence Day Today Prime Minister address country Chief Minister will hoist the flag Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह! आज पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन, तर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी करणार ध्वजवंदन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/50d114aec55c6939a0dfaa2c6c60ecf71660522160505381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Independence Day 2022 : आज देश आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022) साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील.
प्रथमच 21 तोफांची सलामी
देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज विविध कार्यक्रमांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली असून देशवासियांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच स्वदेशी तोफेच्या सहाय्याने 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे.
तिन्ही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी 7.18 मिनीटांनी आगमन होणार आहे. त्या आधी ते राजघाटवर जाऊन त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लष्कराच्या तिन्ही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री 'वर्षा' शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी 8.15 वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते 9.15 वाजता मंत्रालयात ध्वजरोहणासाठी उपस्थित राहतील.
मुख्यमंत्र्यांनी राखली चाळीस वर्षांची परंपरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री 12 वाजता ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केले. यावेळी शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती तीच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवली आहे. या कार्यक्रमावेळी शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगणार होता. कारण उद्धव ठाकरे गटात असलेल्या राजन विचारे यांनी पोलिसांनी नोटीस देऊन देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आल्याने काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर उत्साह, प्रभात फेरी निघणार
देशात आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. राज्यातील त्या-त्या राजधानीच्या ठिकाणी संबंधित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडणार आहे. तर देशाच्या विविध ठिकाणी आज विद्यार्थी आणि तरुणांकडून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
Independence Day 2022 :...आणि भारत देश स्वतंत्र झाला; 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जाणून घ्या स्वातंत्र्य दिनाचा इतिहास
महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, राज्याला 84 पोलीस पदकं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)