Independence Day : पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकरांचे आज स्मरण, देश या सर्वांचा ऋणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15th August 2021 : लाल किल्ल्यावर येण्याआधी पंतप्रधानांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं. प्रत्येक महान व्यक्तित्वांचे स्मरण देश करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
![Independence Day : पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकरांचे आज स्मरण, देश या सर्वांचा ऋणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी Independence Day 2021 Prime Minister Narendra Modi Remembered Pandit Nehru Sardar Patel Babasaheb Ambedkar today Independence Day : पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकरांचे आज स्मरण, देश या सर्वांचा ऋणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/dc481a835538ed1fbb07573d8b12cbed_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, देशाला एकजूट राष्ट्र म्हणून आकार देणारे सरदार वल्लभभाई पटेल किंवा भारताला भविष्याचा मार्ग दाखवणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा प्रत्येक महान व्यक्तित्वांचे स्मरण देश करत आहे, देश या सर्वांचा ऋणी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी लाल किल्ल्यावरुन त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.
आजपासून प्रारंभ होत पुढील 25 वर्षे होणारा विकासाचा प्रवास हा भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड आहे. या अमृत कालखंडात आपल्या संकल्पांची पूर्तता होईल, आपल्याला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत नेईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्य दिनी आपल्याला आणि जगभरात भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाही प्रिय असणाऱ्या सर्वांना पंतप्रधानानी यावेळी शुभेच्छा दिल्या.
देश नव्या संकल्पातून पुढे जात असून नवीन संकल्पांना आधार बनवून विकास साध्ये करायला हवा. आज भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून येत्या 25 वर्षात भारतीय स्वातंत्र्य 100 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या अमृतकाळाच्या सोहळ्यावेळी आपण आज केलेल्या संकल्पांची सिध्दी करणं आवश्यक आहे. ती आपल्यासाठी गौरवपूर्ण गोष्ट असेल
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या चतु:सूत्री च्या माध्यमातून शतप्रतिशत विकास साधता येईल. त्यामुळे कोणीही विसासापासून वंचित राहणार नाही. 2024 पर्यंत रेशनच्या माध्यमातून, मध्यान आहार योजनेच्या माध्यमातून सर्व गरिबांना तांदूळ फोर्टिफाईड करुन वितरित करण्यात येणार आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपले डॉक्टर, आपल्या परिचारिका, आपले निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस तयार करण्यामध्ये गुंतलेले शास्त्रज्ञ असोत, सेवा करणारे नागरिक असोत, हे सर्वच वंदन करण्यायोग्य आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं.
एकविसाव्या शतकात भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. यासाठी जे वर्ग मागे आहेत त्यांना आपल्याला मदतीचा हात दिलाच पाहिजे असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
लाल किल्ल्यावर येण्याआधी पंतप्रधानांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं. पंतप्रधान तिरंगा ध्वज फडकवत असताना पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वायुदलाच्या मार्फत पुष्पवर्षाव करण्यात आला.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)