(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजस्थान विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस दोन तर भाजप एका जागेवर विजयी
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवारांना आशीर्वाद व पाठिंबा देऊन या भागातील जनतेने आमच्या सरकारला अधिक बळ दिले आहे.
नवी दिल्ली : राजस्थानमधील तीन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने दोन जागा जिंकल्या तर एका जागेवर भाजपने यश मिळवलंय. सहडा आणि सुजानगड जागेवर काँग्रेसचे उमेदवार आणि राजसमंद जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. जनतेचा त्यांच्या सरकारवरील विश्वास असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे.
कोण कुठून विजयी?
सुजानगडमध्ये काँग्रेसचे मनोजकुमार मेघवाल विजयी झाले. त्यांना 79,253 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार खेमाराम यांना 43,642 मते मिळाली. सहडामध्ये काँग्रेसच्या उमेदवार गायत्री देवी यांनी भाजपच्या डॉ. रत्नलाल जाट यांना 42,200 मतांनी पराभूत केले. गायत्री देवी यांना 81,700 (58.21%) आणि जाट यांना 39,500 (28.14%) मते मिळाली. राजसमंदमध्ये भाजपच्या दीप्ती माहेश्वरी यांनी 5310 मतांनी विजय मिळविला. दीप्ती यांना 74,704 (49.74%) मते मिळाली तर काँग्रेसचे तनसुख बोहरा यांना 69,394 (46.21%) मते मिळाली.
'हे' राहिले वैशिष्ट्य
विशेष म्हणजे या तिन्ही जांगावर दिवंगत आमदारांच्या नातेवाईकांनी विजय मिळवला आहे. सुजानगड मतदारसंघातून विजयी झालेले मनोज कुमार दिवंगत आमदार मास्टर भंवरलाल मेघवाल यांचे पुत्र आहेत. सहडा मतदारसंघातून विजयी झालेल्या गायत्री देवी या मतदारसंघातील दिवंगत आमदार कैलाश त्रिवेदी यांच्या पत्नी आणि राजसमंद मतदारसंघातून विजयी झालेल्या दीप्ती माहेश्वरी दिवंगत आमदार किरण माहेश्वरी यांची कन्या आहेत. भंवरलाल मेघवाल, कैलास त्रिवेदी आणि किरण माहेश्वरी यांच्या मृत्यूमुळे तिन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.
सीएम गहलोत यांच्याकडून अभिनंदन
मुख्यमंत्री गहलोत यांनी पक्षाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि ट्वीट केले की, सहडा (भिलवारा) येथील काँग्रेसचे उमेदवार गायत्री देवी आणि सुजानगड (चूरू) मधील मनोज मेघवाल यांना हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. राजसमंद पोटनिवडणूकही एकजुटीने लढली. येथे भाजपचा विजय खूप कमी मतांनी झाला आहे.
ते म्हणाले, 'काँग्रेसच्या उमेदवारांना आशीर्वाद आणि पाठिंबा देऊन या भागातील जनतेने आमच्या सरकारला अधिक सामर्थ्य दिले आहे आणि विकासाला मजबूत जोड दिली आहे. यासाठी मी मतदारांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो. मी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन करतो.