Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पाऊस, उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम
Weather Forecast : चक्रीवादळामुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार अजूनही कडक उन्हाच्या चटक्याने होरपळत आहे.
![Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पाऊस, उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम imd weather update maharashtra heatwave in up bihar jharkhand delhi ncr rajasthan get rainfall know update Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पाऊस, उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/b81e4162303f080ea79bdfd8ee9889891686964179815215_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Weather Update : देशातील काही भागात पावसाच्या सरी पडत आहेत, तर काही भागात उन्हामुळे अंगाची लाही-लाही होताना पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांत देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह देशातील बहुतांश भागात पावसामुळे आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
कुठे ऊन, कुठे पाऊस
उत्तर आणि पूर्व भारतात मात्र नागरिकांना उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. गुजरातला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हा पाऊस अधून-मधून उसंत घेतानाही पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे.
काही भागात पावसाची शक्यता
सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली, हरियाणासह अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे, त्यामुळे तापमानात घट झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीत पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. तर, महाराष्ट्राच्या काही भागातही पाऊस हजेरी लावणार आहे. आज मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता
दिल्लीत शुक्रवारनंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्लीत पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. आज राष्ट्रीय राजधानीचे कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27.9 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. उत्तर प्रदेशामध्ये उष्णतेची लाट अजूनही कायम राहणार असली तरी, यासोबतच उत्तर आणि पूर्व भारतातील बहुतांश भाग पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेत राहतील.
कुठे पाऊस पडेल?
गुजरात, राजस्थान, आसाम आणि मेघालयात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये पाऊस अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टी, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार, केरळमध्ये हलका पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)