IMD Weather Update : देशभरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, तुमच्या राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल? वाचा IMD चा अंदाज
IMD Weather Update : उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आर्द्रतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
IMD Weather Update : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर देशभरात पाऊस (Rain) पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे उत्तर भारतातील लोकांना दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, (IMD) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात आज शुक्रवारी (25 ऑगस्ट) रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, या आठवड्यात उत्तर पश्चिम भारताच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
काल गुरुवारी (24 ऑगस्ट) देशाची राजधानी दिल्लीतही (Delhi) हवामान आल्हाददायक होते. आकाश ढगाळ राहिल्याने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला. काल दिल्लीचे कमाल तापमान 33.2 अंश होते, जे सर्वसामान्य तापमानापेक्षा 1 अंश कमी होते. किमान तापमान सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी 24.3 नोंदले गेले. आजही राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
'या' राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज
स्कायमेटच्या मते, पुढील शुक्रवारी पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तर पंजाब, उत्तर हरियाणा, मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील गंगा भागात हलका पाऊस झाला. पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहिले.
लखनऊमध्ये तीन दिवस हलक्या-मध्यम सरीचा पाऊस
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने वातावरण चांगलेच आल्हाददायक राहिले आहे. लखनऊमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे त्यामुळे लखनऊच्या लोकांनी उष्णतेपासून सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गुरुवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली, जो रात्री उशिरापर्यंत अधूनमधून सुरूच होता. शुक्रवारी सकाळीही अंशतः ढगाळ वातावरण होते.
मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :