(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुत्र्याला फिरवण्यासाठी मैदान रिकामं करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांची लडाखला अखेर बदली
दिल्लीचे आयएएस अधिकारी संजीव खिरवारांची बदली लडाखला केली असून त्यांच्या पत्नीची बदली अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आली.
MHA Order Transfer : दिल्लीमधील संजीव खिरवार हे आयएएस अधिकारी त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरण्यावरून वादात सापडले आहेत. खरंतर बरेच दिवस खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक सरावात व्यत्यय येत असल्याची तक्रार करत होते. पण कुत्र्याला फिरण्यासाठी खिरवारांनी अख्खं मैदान रिकामं केलं. केंद्रीय गृहमंत्रालयानं अधिकारी संजीव खिरवारांची बदली लडाखला केली असून त्यांच्या पत्नीची बदली अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आली.
ज्या ट्रॅकवर खेळाडू घाम गाळतात, तो ट्रॅक कुत्र्यासोबत फेरफटका मारण्यासाठी रिकामा केला जातो, असा आरोप दिल्लीचे आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांच्यावर केला जात आहे. खिरवार हे रोज रात्री साडे आठ वाजता त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला घेऊन फिरायला येतात. साधारणतः खेळाडूंसाठी ही सरावाची वेळ असते. पण खिरवार यांच्यासाठी हे स्टेडियम रिकामं केलं जातं असा आरोप आहे पण आपल्यावरचे सगळे आरोप खिरवार यांनी फेटाळले आहेत. आपल्यामुळे खेळाडूंच्या सरावावर कोणताही परिणाम होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
Hours after a news report regarding the misuse of facilities at Thyagraj Stadium by Sanjeev Khirwar & his wife Rinku Dugga, MHA has transferred both the AGMUT cadre IAS officers Sanjeev Khirwar & Rinku Dugga to Ladakh and Arunachal Pradesh from Delhi respectively: MHA order pic.twitter.com/teMHyNPwhw
— ANI (@ANI) May 26, 2022
संजीव खिरवार कोण आहेत?
- संजीव खिरवार हे 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत
- खिरवार सध्या दिल्लीत महसूल आयुक्त म्हणून कार्यरत आहेत
- याशिवाय दिल्ली सरकारमध्ये प्रधान सचिव तसंच पर्यावरण आणि वन विभागाचं कामही ते पाहतात
त्यागराज स्टेडियम 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेसाठी बांधण्यात आलं होतं. संध्याकाळीच स्टेडियम खाली केलं जायचं पण मुख्यमंत्री केजरीवालांनी खेळाडूंसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला. ज्या खेळाडूंना उशिरापर्यंत सराव करायचा आहे, अशा साऱ्यांसाठी दिल्लीतील मैदानांची वेळ रात्री 10 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.
भारतात क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांबाबत अनेक तक्रारी आहेत. पण दिल्लीतल्या या प्रकरणामुळे एका सरकारी अधिकाऱ्याकडूनच खेळाडूंना त्रास होत असेल तर याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.