Anudeep Durishetty : हैदराबादचा सर्वात तरुण कलेक्टर, चार वेळा अपयश.. पाचव्या प्रयत्नात थेट UPSC टॉपर; देशात पहिला आलेल्या अनुदीप दुरीशेट्टीची सक्सेस स्टोरी
Anudeep Durishetty : केवळ पाच वर्षाच्या सेवेनंतर हैदराबाद सारख्या प्रमुख जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी निवड झाल्यानंतर अनुदीप दुरीशेट्टी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
Anudeep Durishetty Success Story : तेलंगणातील हैदराबाद जिल्ह्याचे (Hyderabad District Collector) जिल्हाधिकारी म्हणून अनुदीप दुरीशेट्टी (Anudeep Durishetty) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते हैदराबादचे आतापर्यंतचे सर्वात तरुण जिल्हाधिकारी आहेत. केवळ पाच वर्षे आयएएस अधिकारी म्हणून काम केल्यानंतर आता थेट हैदराबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे. अनुदीप दुरीशेट्टी हे 2018 सालच्या बॅचचे अधिकारी असून 2017 सालच्या परीक्षेत ते देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. पाचव्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलं आहे.
तेलंगणाच्या अनुदीप दुरीशेट्टींचा यूपीएससीपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. चार वेळा अपयश आल्यानंतर पाचव्या प्रयत्नात ते देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अभ्यासात सातत्य, जिद्द आणि संयमाच्या जीवावर त्यांनी हे यश संपादन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
UPSC Topper Anudeep Durishetty : अनुदीप दुरीशेट्टींची पार्श्वभूमी
अनुदीप दुरीशेट्टी तेलंगणातील मेटपल्ली गावाचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षणही त्याच गावात पूर्ण झाले. त्याचे वडील सरकारी कर्मचारी असून आई गृहिणी आहे. शालेय शिक्षणानंतर, अनुदीप दुरीशेट्टी यांनी 2011 मध्ये BITS पिलानी, राजस्थान येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये ही पदवी घेतली. यादरम्यान त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निश्चय केला.
अनुदीप दुरीशेट्टी यांनी 2012 साली पहिला प्रयत्न केला आणि त्या वर्षी ते मुलाखत फेरीत पोहोचले, पण त्यांची निवड झाली नाही. पुढच्याच वर्षी, 2013 मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली परंतु त्यांच्या कमी रँकमुळे त्यांना IRS सेवा मिळाली. येथे ते कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज ऑफिसर म्हणून रुजू झाले पण आयएएस पदासाठीचे त्यांचे प्रयत्न थांबले नाहीत. मानवंशशास्त्र हा ऑप्शनल विषय ठेऊन त्यांनी तयारी केली. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं.
पहिल्या प्रयत्नात निवड न झाल्याने अनुदीप दुरीशेट्टी गुगल इंडिया कंपनीत रुजू झाले आणि हैदराबादमध्ये काम करू लागले. अनुदीप यांच्या तयारीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे पूर्ण तयारीदरम्यान त्यांनी कधीही नोकरी सोडली नाही. या कारणास्तव, त्यांची मुख्य तयारी केवळ काही आठवडे शिल्लक राहिले असतानाच व्हायची. या काही दिवसात ते जीव लावून अभ्यास करायचे.
पाचव्या प्रयत्नात अनुदीप दुरीशेट्टी यांनी नुकतंच आयएएस मिळवलं नाही तर ते देशात पहिले आले. प्राधान्यक्रम ठरवा आणि काम करा, निवडक अभ्यास करुन यश प्राप्त होत नाही असा सल्ला त्यांनी दिला आहे. शक्यतो उत्तरे लिहिण्याचा सराव करा, वृत्तपत्र सतत वाचत राहा आणि इथिक्स आणि निबंधाच्या पेपरला पूर्ण महत्त्व द्या असंही ते सांगतात.
ही बातमी वाचा: