IIT Mandi Director : लोक मांसाहारी झाल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी; IIT मंडीच्या संचालकांचा अजब दावा
IIT Mandi Director Himachal Pradesh Landslide : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडीच्या (IIT-Mandi) संचालकांनी हिमाचल प्रदेशातील वाढत्या भूस्खलनाच्या घटनांबाबत अजब दावा केला आहे.
शिमला/ नवी दिल्ली: यंदाच्या वर्षी हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो नागरिकांचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. या भूस्खलनाच्या वाढत्या घटनांची तज्ज्ञांकडून पाहणी, अभ्यास सुरू असताना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडीच्या (IIT-Mandi) संचालकांनी अजब दावा केला आहे. लोकांनी मासांहार वाढवल्याने या घटना घडत असल्याचे त्यांनी म्हटले.
आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. प्राण्यांवरील क्रूरतेमुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि ढग फुटण्याच्या घटना घडत असल्याचा दावा बेहरा यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना बेहरा म्हणाले की, जर आपण हे करत राहिलो तर हिमाचल प्रदेशात आणखी घटना घडतील. तुम्ही निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात. त्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंध आहे. तुम्ही ते आता पाहू शकत नाही पण ते तिथे आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मांसाहार बंद करा
बेहरा म्हणाले की वारंवार भूस्खलन, ढग फुटणे आणि इतर अनेक गोष्टी घडत आहेत, हे सर्व प्राण्यांवरील क्रूरतेचे परिणाम आहेत. लोक मांस खातात. चांगला माणूस होण्यासाठी काय करायला हवे तर मांस खाणे बंद करा. त्यांनी विद्यार्थ्यांना मांसाहार न करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी व्यक्त केली नाराजी
बेहरा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.उद्योजक आणि आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी संदीप मनुधने यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर म्हटले की, जे काही 70 वर्षात निर्माण केले आहे, ते असे अंधश्रद्धाळू नष्ट करतील. आपले पतन झाले आहे असे म्हणावे लागेल. बायोफिजिक्सचे प्रोफेसर गौतम मेनन यांनी बेहरा यांचे वक्तव्य अत्यंत दुःखद असल्याचे सांगितले.
IIT Mandi's Director Laxmidhar Behera claimed earlier that he drove out ghosts using chants.
— Sandeep Manudhane (@sandeep_PT) September 7, 2023
Now the same chap has claimed that Himachal Pradesh landslides are because people eat meat, causing cloudbursts. Then he forced students to take an oath "I will not eat meat". (yes, he…
बेहरा हे आधीही वक्तव्यांमुळे चर्चेत
बेहरा यांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या वर्षी, त्यांनी एका मित्राची आणि त्याच्या कुटुंबाची मंत्रोच्चार करून दुष्ट आत्म्यांपासून सुटका केल्याचा दावा केला होता. त्यावेळीदेखील ते चर्चेत आले होते.