Himachal Pradesh : मुख्यमंत्र्यांसाठी आणलेले समोसे गायब, सुरक्षारक्षकांनीच ताव मारल्याचं CID चौकशीतून समोर
Himachal Samosa Politics : हिमाचल प्रदेशमध्ये समोसा पॉलिटिक्स जोरात सुरू असून काँग्रेसचे सुखविंदर सिंह सुक्खू चांगलेच अडचणीत आल्याचं दिसून आलंय.
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांसाठी मागवण्यात आलेले समोसे गायब झाल्याच्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासाठी मागवण्यात आलेले समोसे सुरक्षारक्षकांनी खाल्ले. नंतर हे प्रकरण एवढं वाढलं की त्याच्या सीआयडी तपासाचे आदेशही दिल्याची चर्चा आहे. या प्रकरणी गुप्त अहवालही देण्यात आल्याची माहिती समोर येतेय. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला केल्याचं दिसतंय.
मुख्यमंत्र्यांसह आणलेले समोसे गायब
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे 21 ऑक्टोबर रोजी सीआयडी मुख्यालयातील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्यसाठी लक्कड बाजारातील रेडिसन ब्लू हॉटेलमधून समोसे आणि तीन डबे जेवण ऑर्डर करण्यात आले होते. पण समन्वयाच्या अभावामुळे हे समोसे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याची पोलिस उपाधीक्षांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यासाठी ऑर्डर करण्यात आलेले समोसे हे त्या ठिकाणच्या सुरक्षारक्षकांनी चुकून खाल्ल्याचं समोर आलं. त्यानंतर प्रोटोकॉल तोडल्याने तसेच सुरक्षारक्षकांनी केलेल्या गैरवर्तनामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी एक डझन समोसे पाठवून या प्रकरणाता निषेध केला.
सीआयडी प्रमुख काय म्हणाले?
हिमाचल प्रदेश सीआयडीचे महासंचालक संजीव रंजन ओझा यांनी सांगितले की, 21 ऑक्टोबर रोजी सीआयडी मुख्यालयात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता. सायबर क्राइम विंगच्या डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री शिमल्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसाठी अल्पोपाहाराची ऑर्डर देण्यात आली होती, मात्र ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर पोलीस अधिकारी चहा पीत बसले होते. यावेळी अल्पोपाहाराबाबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसाठी आदेश दिलेला अल्पोपाहार कुठे होता अशी विचारणा करण्यात आली.
तपास अहवाल लीक होणे ही चिंतेची बाब
याप्रकरणी चौकशीचे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे सीआयडीच्या प्रमुखांनी सांगितलं. मात्र सीआयडीला लेखी अहवाल प्राप्त झाला असून ही पूर्णपणे सीआयडीची अंतर्गत बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सीआयडीचा व्हायरल होणारा अंतिम तपास अहवाल चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले. एकाही कर्मचाऱ्याविरुद्ध नोटीस बजावली नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात राजकारण करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.
ही बातमी वाचा: