Hijab Row : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी, अनेक जिल्ह्यात कलम 144 लागू
हिजाब प्रकरणावरुन देशात सध्या वादंग निर्माण झाले आहे. याप्रकरणी आज कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Hijab Row : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच राज्यात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आज सकाळी हिजाबच्या मुद्द्याबाबत निकाल देणार आहे.
न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवले होते. उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता. त्यानंतर विरोध सुरु केला होता. हा विरोध इतर जिल्ह्यांमध्ये पसरला आणि मोठा वाद निर्माण झाला. काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून येऊ लागल्याने तणाव निर्माण झाला होता.
हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्याच्या डीसींनी 15 मार्च रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण कन्नडचे डीसी डॉ. राजेंद्र केव्ही म्हणाले की, बाह्य परीक्षा वेळापत्रकानुसार होतील परंतू, सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या अंतर्गत परीक्षा पुढे ढकलण्यात येतील. कलबुर्गीचे डीएम यशवंत व्ही गुरुकर यांनी सांगितले की, हिजाबच्या वादावर मंगळवारी आलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री 8 ते 19 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू केले आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.
हिजाब प्रकरणी मुलींनी हायकोर्टात जाऊन हिजाब परिधान करुन वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी केली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब किंवा भगवी शाल घालण्यास परवानगी नसल्याचा अंतरिम आदेश जारी केल्याने याचिकाकर्त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर!, लवकरच 7 हजार 231 पदांची पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती
- मुंबई पोलीस आयुक्तांचा 'डिलिव्हरी बॉय'ना इशारा, वाहतूक नियम मोडल्यास होणार 'ही' कारवाई
- वाहने उचलून नेणार नाही! मुंबई पोलीस आयुक्तांचे वाहनधारकांना गोड गिफ्ट, मात्र या अटी लागू