Hardik Patel : भाजपकडून 'हार्दिक' स्वागत ! काँग्रेसला रामराम केलेल्या हार्दिक पटेलांचा अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला
हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसमध्ये असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांच्यावर अत्यंत जहरी भाषेत टीका केली होती. हार्दिक पटेल यांनी अमित शहांना 'जनरल डायर' असे संबोधले होते.
गांधीनगर : गुजरातमधील पाटीदार नेते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हार्दिक पटेल यांनी स्वत:एएनआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. काँग्रेसला रामराम केल्यानंतर हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांच्यावर अत्यंत जहरी भाषेत टीका केली होती. हार्दिक पटेल यांनी अमित शहांना 'जनरल डायर' असे संबोधले होते. हार्दिक पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी बोललो त्यावेळी ते पक्षाध्यक्ष होते. अमित शहांनी गृहमंत्री झाल्यानंतर सीएए,कलम 370 वर निर्णय घेतला. त्यामुळे माझे हृदय परिवर्तन झाले.
काँग्रेस सोडत पटेलांकडून प्रहार सुरु
हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताच प्रहार करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी हिंदूंचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप केला होता. राम मंदिरला त्यांनी विरोध केल्याचेही म्हटले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, मी पहिल्यांदा सुद्धा म्हणालो होतो की, काँग्रेस जनतेच्या भावनांना दुखावण्याचे काम करते. नेहमीच हिंदू धर्माच्या आस्थेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आज माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसच्या नेत्याने वक्तव्य केलं की, राम मंदिराच्या वीटांवर कुत्री लघुशंका करतात.
राम मंदिरला विरोध केल्यावरूनही हार्दिक पटेलांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, मी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना विचारू इच्छित आहे की, त्यांना भगवान श्रीरामाशी यांची काय दुश्मनी आहे ? हिंदूना इतका विरोध कशासाठी ? अनेक शतकांनंतर अयोध्येत श्रीरामाचे मंदिर होत आहे आणि काँग्रेस नेते विरोधात अनावश्यक वक्तव्ये करत आहेत.
हार्दिक पटेलांवर देशद्रोहाचा गुन्हा
हार्दिक पटेल यांनी 2015 मध्ये पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व केले होते. गुजरातमध्ये सरकारी नोकरी आणि अन्य ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी पाटीदार समाजाकडून आंदोलन करण्यात आले होते. 2017 मध्ये या आंदोलनाने भाजपला चांगलाच फटका बसला आणि जागाही कमी झाल्या.
हार्दिक पटेल यांच्यावर 2015 ते 2018 या कालावधीत कमीत कमी 30 एफआयआर नोंद आहेत. यामधील 7 गुन्हे 205 मध्ये नोंद आहेत. यामध्ये पाटीदार समुदाय, सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी कोट्याची मागणी, गुजरातमध्ये आंदोलनादरम्यान दंगल आणि देशद्रो यासारख्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. हार्दिक पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याविरोधात 23 केसेस सुरु आहेत.
सद्यस्थितीत हार्दिक पटेल यांच्याविरोधात 11 केसेसची सुनावणी सुरु आहेत. यामध्ये न्यायालयीन कारवाईचा सामना करावा लागला आहे. या दोन केसेस देशद्रोह गुन्ह्याशी संबंधित आहेत. उर्वरित प्रकरणात राज्य सरकारने केसेस परत घेतल्या आहेत किंवा गुजरात उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्या आहेत.तसेच काही प्रकरणांची सुनावणी सुरु झालेली नाही.