Dmart Share Price : डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
Avenue Supermarts Share : अवेन्यू सुपरमार्टसच्या आज तेजी पाहायला मिळाली. तिसऱ्या तिमाहीजे रिझल्ट जाहीर होताच डीमार्टच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
DMart Share Price मुंबई : राधाकिशन दमानी यांची रिटेल क्षेत्रातील कंपनी अवेन्यू सुपमार्ट्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. डीमार्ट नावानं या कंपनीची स्टोअर आहेत. या कंपनीच्या शेअरनं आज बऱ्याच काळानंतर मोठी झेप घेतली. अवेन्यू सुपरमार्टसच्या शेअरमध्ये आज 15 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. शेअर 554 रुपयांनी वाढून 4165 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत तेजी 11 टक्क्यांपर्यंत खाली आली. बाजार बंद झाला तेव्हा शेअर 4024 रुपयांवर होता.
अवेन्यू सुपरमार्टसची आर्थिक वर्ष 2024-25 तिसऱ्या तिमाहीतील कामगिरी चांगली राहिली. तिसऱ्या तिमाहीचे आकडे समोर येताच या कंपनीचा शेअर रॉकेट बनला. क्विक कॉमर्स कंपन्यांकडून आव्हान मिळत असताना देखील अवेन्यू सुपरमार्टसची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळं आज शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 17.5 टक्क्यांनी वाढून 15565.23 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 13247.33 कोटी रुपये होता. 31 डिसेंबरपर्यंत कंपनीचे देशभरात 387 स्टोअर्स आहेत.
शेअर बाजारात आज 720 अंकांची घसरण पाहायला मिळाली. मात्र, अवेन्यू सुपरमार्टसच्या स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. गेल्या सत्रात हा शेअर 3611 रुपयांवर बंद झाला होता. आज 15 टक्क्यांच्या तेजीसह 4166 रुपयांवर पोहोचलाहोता. बाजार बंद झाला तेव्हा शेअर 4024 रुपयांवर होता. या शेअरनं 5900 रुपयांपर्यंत झेप घेतली होती.
अवेन्यू सुपरमार्टसच्या शानदार आकडेवारीमुळं विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएनं आउटपरफॉर्मचं रेटिंग दिलं आहे. हा शेअर 5360 रुपयांचं टारगेट ठेवून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मॉर्गन स्टॅनली आणि Macquaire नं 3700 रुपयांचं टारगेट दिलं आहे.
तज्ज्ञांच्या मते डीमार्ट एक डिस्काउंट रिटेलर आहे. ग्राहकांना कमी किंमतीवर किराणा माल उपलब्ध करुन दिला जातो. तिसऱ्या तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळं डीमार्टच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सीएलएसएनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की 500 अब्ज डॉलर्सच्या किराणा मालाच्या विक्रीतील मोठा भागिदार आहे.
दरम्यान, शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 720 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर, निफ्टी 50 मध्ये 183 अकांची घसरण पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 79223.11 आणि निफ्टी 50चा निर्देशांक 24004.75 अंकांवर आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :
Dmart Share Price : डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?