Gujarat Assembly Election : आजपासून गुजरातमध्ये भाजपचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर, गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती
गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आजपासून दोन दिवसांचे चिंतन शिबिर घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हे दोन दिवसीय चिंतन शिबिर होत आहे.
Gujarat Assembly Election : गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपचे आजपासून दोन दिवसांचे चिंतन शिबिर घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्या उपस्थितीत हे दोन दिवसीय चिंतन शिबिर होत आहे. मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि मंत्री पुरुषोत्तम रुपाला हेही या शिबिरात उपस्थित राहणार आहेत. बैठकीत शासन आणि संघटनेच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा देखील घेतला जाणार आहे.
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप शिबिरात ठरवला जाणार आहे. यामध्ये आगामी काळात पक्षासमोर असणाऱ्या आव्हानांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीला 40 प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजप कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजप संसदीय मंडळाचे सदस्यही शिबिरात उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात बोर्ड महामंडळाच्या निवडणुकांवरही चर्चा होणार आहे. बोर्ड महामंडळासाठी उमेदवारांच्या नावांवर चिंतन बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच महामंडळाला प्राप्त झालेल्या 1 हजार 400 अर्जापैकी अंतिम नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकतो. दरम्यान, सहकारी संघटना आणि एससी-एसटी मोर्चाच्या बैठकीत आढावा अहवालावर चर्चा होऊ शकते. रिपोर्ट कार्डमध्ये 2022 च्या निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांवर गुजरातच्या सध्याच्या समस्या आणि कामगिरीवर चर्चा होणार आहे.
गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षापासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यांत राज्याचे दोन दौरे केले आहेत. या दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान येत्या काही महिन्यात पंतप्रधान पुन्हा गुजरातला भेट देणार आहेत.
गुजरातमध्ये यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक नियोजित आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी देखील उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. दिल्ली, पंजाब ही राज्य काबिज केल्यानंतर केजरीवाल यांची नजर आता गुजरात आणि हिमाचल प्रदेश या भाजपशासित राज्यांवर आहे. या दोन्ही राज्यांमधील आम आदमी पक्षाच्या वाढत्या ताकदीमुळे इथल्या विधानसभा निवडणुका मुदतपूर्व घेण्याचा किंवा स्थगित करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.