Goa : कॉंग्रेसचा डाव फसला! मुलाविरोधात निवडणूक लढणार नसल्याची माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंची घोषणा
Goa Election : सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या पोरिम मतदार संघातील बाप विरुद्ध मुलगा ही लढत सुरु होण्यापूर्वीच संपली आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी अचानक राजकीय निवृत्तीची घोषणा केली.
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि त्यांचा मुलगा आरोग्यमंत्री डॉ. विश्वजीत राणे यांच्यामध्ये थेट लढत होणार होती. पण आता काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह राणे यांनी अचानक राजकीय निवृत्तीची घोषणा केल्याने काँग्रेसचा डावपेच फसला आहे. आपल्याला आता विश्रांतीची गरज असून तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचं प्रतापसिंह राणे म्हणाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी 21 डिसेंबर रोजी त्यांच्या मुलाच्या म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. विश्वजीत राणे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. काँग्रेसने प्रतापसिंह राणेंची उमेदवारी जाहीर करुन षटकार मारल्याची चर्चा त्यावेळी सुरु होती. बाप विरुद्ध मुलगा अशी लढत असल्याने या लढतीबाबत राज्यातच नव्हे तर देशामध्ये उत्सुकता होती.
पण प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना आपण राजकीय निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आणि काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोरिम मतदारसंघात आता काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरु आहे.
आगामी निवडणुकीसाठी गोव्यात आता काँग्रेसकडे उमेदवार उरला नाही अशी परिस्थिती झालीय. ज्यांना तिकीट दिलं ते देखील आता ऐनवेळी पक्ष सोडून जायला लागले आहेत.
गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून वंचित रहावं लागलं होतं आणि भाजपने सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजपने काँग्रेला मोठी खिंडार पाडत 15 आमदार फोडले. त्यामुळे काँग्रेसचे केवळ 2 आमदार उरले आहेत.
गोव्यात भाजप, तृणमूल काँग्रेस, आप यांनी जोरदार तयारी केलीय. सध्या एकमेकांच्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच देखील सुरु आहे. आशा परिस्थितीत प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देखील सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या या लढाईत नेमकं कोण बाजी मारणार हे पुढील वर्षीच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या :