(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गाझियाबाद: चार महिन्यांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीचे छत कोसळून अपघात, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, या स्मशानभूमीची छत सुमारे चार महिन्यांपूर्वी तयार झाली होती. पण पाऊस पडल्यानंतर ती कोसळली. घटनास्थळी उपस्थित एनडीआरएफच्या पथकाने एबीपी न्यूजला सांगितले की छत तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या साहित्याची गुणवत्ता खराब आहे.
गाझियाबाद : दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये आज सकाळपासून झालेल्या पावसामुळे मुरादनगर परिसरातील स्मशानभूमीत छत पडले. सीएमएस अनुराग भार्गव यांच्या माहितीनुसार, या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ढिगाऱ्यामधून 30 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आयजी मेरठ झोन प्रवीण कुमार म्हणाले की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
चार महिन्यांपूर्वीच बांधलं होतं स्मशानभूमीचे छत
वास्तविक, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी या छताखाली उभे असताना हा अपघात झाला. अचानक छत कोसळल्याने आसऱ्यासाठी आलेले लोक छताखाली दबले. याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिस व अन्य पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांनी बचावकार्य राबवले. मिळालेल्या माहितीनुसार या स्मशानभूमीचे छत चार महिन्यांपूर्वी बांधले होते.
घटनेसंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2-2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. विभागीय आयुक्त, मेरठ आणि एडीजी मेरठ झोन यांना घटनेसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. छत पडण्याच्या घटनेची दखल घेत सीएम योगी यांनी जिल्हा दंडाधिकारी व वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना तातडीने घटनास्थळी पोहचून मदत व बचावकार्य करण्याचे आदेश दिले.
छत उभारण्यासाठी नित्कृष्ट दर्जाच्या सामग्रीचा वापर
या घटनेस उपस्थित असलेल्या एनडीआरएफच्या पथकाने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की स्मशानभूमीचे छत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री निकृष्ट दर्जाची आहे. सिमेंटचा वापर क्वचितच बांधकामात केला गेलेला पाहायला मिळाला आहे. एनडीआरएफने सांगितले की खराब सामग्रीमुळे अपघात होऊ शकतो. श्वान पथकाने तपासणी केली जात आहे.