GDP : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या 40 वर्षांचा विक्रम मोडला, जीडीपीमध्ये 7.3 टक्क्यांची घसरण
केवळ कृषी (3.6 टक्के) आणि इलेक्ट्रिसिटी (1.9 टक्के) या दोन क्षेत्रांमध्ये वृद्धी नोंद करण्यात आली असून इतर सर्वच क्षेत्रामध्ये नकारात्मक वृद्धीची नोंद झाली आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन हे जीडीपी (GDP) घसरण्यामागे मोठं कारण असल्याचं एनएसओनं (NSO) स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या 40 वर्षातील सर्वाधिक खराब प्रदर्शन केलं असून 2020-21 या वर्षामध्ये जीडीपी 7.3 टक्क्यांनी घसरल्याचं स्पष्ट झालंय. या संबंधी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने आकडेवारी जाहीर केली असून 2020-21 सालच्या चौथ्या तिमाहीत जीडीपी 1.6 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलंय. एनएसओने जारी केलेल्या या आकडेवारीवरुन भारतीय अर्थव्यवस्था किती नाजून बनली आहे हे स्पष्ट होतं.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनामुळे देशभरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. जुलै 2020 नंतर हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात आलं. पण या दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलंय. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 24.38 टक्क्यांनी आकसला होता. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत यात काही सुधारणा झाली होती. नंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 0.4 टक्के वृद्धी झाली होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत 1.6 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्या आधीच्या वर्षी म्हणजे 2019-20 साली भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास केवळ 4 टक्क्यांनी झाला होता.
For the financial year 2020-21, GDP growth at -7.3% as compared to 4.0 percent in 2019-20: Govt of India pic.twitter.com/bxSpU5skRF
— ANI (@ANI) May 31, 2021
या वर्षी जीडीपीमध्ये जवळपास 8 टक्क्यांची घसरण होईल अशी शक्यता एनएसओने आधीच व्यक्त केली होती. या आधी 1979-80 या आर्थिक वर्षात दुष्काळ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानं देशाच्या जीडीपीमध्ये 5.3 टक्क्यांची घसरण झाली होती. आता त्यापेक्षाही अधिक म्हणजे 7.3 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलंय.
देशाचा जीव्हीए म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू अॅडेडमध्येही 6.2 टक्क्यांची घसरण झाली असून गेल्या वर्षी ही घसरण 4.1 टक्के इतकी होती. केवळ कृषी, वने आणि मासेमारी या क्षेत्राने 3.6 टक्के आणि इलेक्ट्रिसिटी, गॅस आणि पाणीपुरवठा क्षेत्राने 1.9 टक्के वृद्धी दर्शवली आहे. ही दोन क्षेत्रं सोडता इतर सर्वच क्षेत्रामध्य़े नकारात्मक विकास झाल्याचं दिसून आलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Pawar-Fadnavis Meet : भेटीचा राजकीय अर्थ काढणं चुकीचं, पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असावं : संजय राऊत
- Coronavirus Cases India : देशात मागील 54 दिवसांतील सर्वाधिक कमी कोरोनाबाधितांची नोंद; पाहा नेमका आकडा
- Covid19 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आपल्या मुलांना 'फ्लू'ची लस देणं का महत्वाचं आहे?