(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर प्रदेशात बस उडणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण चर्चेत
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण सध्या चर्चेत असून त्यांनी प्रयागराजमध्ये उडणारी बस आणणार असल्याचे सांगितले.
Nitin Gadkari : रस्ते निर्मितीमुळं रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील असं आश्वासन नितीन गडकरींनी दिले. एवढंच नव्हे तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही गडकरींनी म्हटलं. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीन गडकरींनी प्रयागराजमधल्या सभेत उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सी-प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक प्रकल्पांचं आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलं आहे.
काय म्हणाले गडकरी?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभेत म्हटले की, प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांनी म्हटले की, प्रयागराजमध्ये बांधण्यात येणारा रिंग रोड आणि फाफामऊ येथील गंगेवर बांधण्यात येणारा सहा पदरी पूल 2024 पर्यंत पूर्ण होईल. हायड्रोजन इंधनाचा वापरही आता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्या मदतीने तयार करण्यात येणारा इथेनॉलचा वापर वाहन इंधनात करण्यात येईल. त्यामुळे पेट्रोलची किंमत 110 रुपयांहून 68 रुपयांपर्यंत येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
पाहा व्हिडिओ : उत्तर प्रदेशात बस उडणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण चर्चेत
उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होणार
या सभेत नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होणार असल्याचे म्हटले. आतापर्यंत झालेली कामे ही फक्त ट्रेलर असल्याचे गडकरी यांनी म्हटले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथचे कौतुक
उत्तर प्रदेश सरकारच्या कामाचे कौतुक केले. उत्तर प्रदेशातील गुंडाराज संपले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडाना पिटाळून लावले आहे. अनेकजण तुरुंगात गजाआड असल्याचे त्यांनी म्हटले.