प्युअर व्हेजिटेरियन कुटुंबाला पाठवली चिकन करी, रेस्टॉरंटला 20 हजारांचा दंड
Madhya Pradesh : मटर पनीरची ऑर्डर दिली असताना चिकन करीची डिलिव्हरी दिल्यामुळे रेस्टॉरंटला तब्बल 20 हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे.

Madhya Pradesh : चुकीची डिलिव्हरी देणे रेस्टॉरंटला चांगलेच महागात पडले आहे. मटर पनीरची ऑर्डर दिली असताना चिकन करीची डिलिव्हरी दिल्यामुळे रेस्टॉरंटला तब्बल 20 हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील ही घटना आहे. रेस्टॉरंटने चुकीची डिलिव्हरी दिल्यामुळे ग्राहकाने थेट ग्राहक मंचाकडे तक्रार केली. यावेळी ग्राहक मंचाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला असून रेस्टॉरंटला 20 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
ग्वाल्हेर शहरातील रहिवासी असलेले वकील सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी 26 जून 2021 रोजी ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपद्वारे मटर पनीरची ऑर्डर दिली होती. पण डिलिव्हरी अॅपने चिकन करी डिलिव्हरी केली. त्यामुळे श्रीवास्तव यांनी याविरोधात जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेऊन ग्राहक मंचाने संबंधित रेस्टॉरंटला 20 हजार रूपयांचा दंड ठोठावला. शिवाय या दंडासोबत तक्रारदाराला हा खटला लढण्यासाठी आलेला खर्च देखील देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.
ग्राहक मंचाने निकाल देताना म्हटले की, "चुकीची डिलिव्हरी देणे ही रेस्टॉरंटच्या सेवेतील कमतरता आहे. चुकीचे अन्न पाठवल्यामुळे तक्रारदार उपाशी राहिला, शिवाय तो शाकाहारी असल्यामुळे त्याच्या भावना दुखावल्या आहेत, हा घोर निष्काळजीपणा आहे. रेस्टॉरंटच्या चुकीमुळे त्याला मानसिक आणि शारीरिक आघातही झाला आहे. त्यामुळे रेस्टॉरंटकडून संबंधित ग्राहकाला 20 हजार रूपये द्यावे लागतील. शिवाय खाद्यपदार्थाच्या ऑर्डरसाठी भरलेले 260 रुपये परत करावे लागतील. याबरोबरच ग्राहक मंचात लढलेल्या खटल्याच्या खर्चापोटी तक्रारदाराला अडीच हजार रुपये वेगळे द्यावे लागतील.
चुकीच्या डिलिव्हरीमुळे कुटुंबात वाद
श्रीवास्तव यांनी चुकीचे खाद्यपदार्थ पाठवल्याची तक्रारही केली होती. मात्र त्याचे निराकरण झाले नाही. त्यामुळे त्यांनी 11 ऑगस्ट 2021 रोजी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. श्रीवास्तव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, "ऑर्डर केलेले जेवण मिळाले नाही, त्याऐवजी ते मांसाहारी पाठवले गेले. रेस्टॉरंटमधून मागवलेले जेवण उघडले त्यावेळी ते मांसाहारी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कुटुंबात वाद झाला. आई रक्तदाबाची रुग्ण आहे, त्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला. आईने आम्हाला स्वयंपाकघरात जाऊ दिले नाही. यामुळे आमचे कुटुंब रात्रभर उपाशी होते. त्यामुळे कुटुंबियांना खूप मानसिक त्रास झाला."























