(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फेसबुकच्या भारत धोरणाची गुपितं उद्या उघडणार? आंतरराष्ट्रीय कर्मचारी प्रथमच चौकशी समितीसमोर
फेसबुकवर सामाजिक द्वेष पसरवण्यात मदत केल्याचे गंभीर आरोप होत आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये देशाची राजधानी दिल्लीत ज्या दंगली झाल्या होत्या. फेसबुकची अशा विघातक कामांसाठी मदत झालीय का याचा पर्दाफाश लवकरच होणार आहे. कारण पहिल्यांदाच फेसबुकचा एखादा आंतरराष्ट्रीय कर्मचारी आता भारतीय चौकशी समितीसमोर हजर होणार आहे.
नवी दिल्ली - जे फेसबुक तुमच्या आमच्या आयुष्याचा भाग बनलंय. त्या फेसबुकवर सामाजिक द्वेष पसरवण्यात मदत केल्याचे गंभीर आरोप होत आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये देशाची राजधानी दिल्लीत ज्या दंगली झाल्या होत्या. त्यातही फेसबुकची अशा विघातक कामांसाठी मदत झालीय का याचा पर्दाफाश लवकरच होणार आहे. कारण पहिल्यांदाच फेसबुकचा एखादा आंतरराष्ट्रीय कर्मचारी आता भारतीय चौकशी समितीसमोर हजर होणार आहे.
फेसबुक समाजाला जोडण्याचं काम करतंय की तोडण्याचं.? अल्पंसंख्यांकाबद्दल चुकीच्या भावना पसरवण्यात फेसबुकची मदत होते? या आणि अशा अनेक गंभीर प्रश्नांचा पर्दाफाश आता होणार आहे. कारण पहिल्यांदाच फेसबुकचा एखादा आंतरराष्ट्रीय कर्मचारी आता भारतीय चौकशीसमोर फेसबुकची गुपितं उघड करणार आहे. ज्याचं नाव आहे मार्क लुकी. फेसबुकमध्ये डिजीटल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून लुकी यांनी 2017 ते 2018 या वर्षात काम केलेलं आहे.
फेसबुकवर काय आरोप आहेत
- द्वेष आणि हिंसक भावनेनं भरलेल्या मजकुराबाबत फेसबुक भारतात पुरेशी काळजी घेत नाही
- ज्या देशांत कडक कायदे आहेत तिथे फेसबुकची पॉलिसी कठोर आहे. मात्र भारतात अशा पोस्टकडे तक्रारी करुनही दुर्लक्ष केल्याचा आरोप
- फेब्रुवारीत झालेल्या दिल्ली दंगलीदरम्यान अशा अनेक द्वेषमूलक पोस्ट फेसबुकवरुन व्हायरल झाल्या, पण फेसबुकनं त्या वेळीच हटवल्या नाहीत.
दिल्ली विधानसभेनं मार्चमध्ये याबाबत चौकशीसाठी शांतता आणि सद्भभावना समिती स्थापन केली होती. आपचे आमदार राघव चढ्ढा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीसमोर उद्या मार्क लुकी हजर होणार आहेत. 10 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता समितीनं बैठक बोलावली आहेत. विशेष म्हणजे त्यात मार्क लुकी यांची जी साक्ष आहे तिचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे. यात पारदर्शकता राहावी यासाठी हे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे.
कोण आहेत मार्क लुकी मार्क लुकी हे फेसबुकमध्ये डिजीटल स्टॅटेजिस्ट म्हणून काम करत होते, याशिवाय ते वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेसाठी पत्रकारिताही करत होते, ते लेखकही आहेत. त्यांच्या साक्षीतून फेसबुकच्या भारतातल्या धोरणाबद्दलच्या अनेक बाबी उघड होतील अशी आशा समितीला आहे.
फेसबुकवर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. याच्या आधी फेसबुकच्या इंडिया पॉलिसी चीफ आंखी दास यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. वादग्रस्त पोस्टवर कारवाई केली तर भारतात सत्ताधीश असलेल्या भाजपचं मत आपल्याबाबत चांगलं होणार नाही, भारतात बिझनेस करणं कठीण होईल असं फेसबुकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगत असल्याचा दावा अमेरिकन वृत्तपत्रांनी केला होता.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या या रिपोर्टनंतर भारतात खळबळ उडाली. संसदेच्या स्थायी समितीसमोर आंखी दास यांनी हजेरी लावली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. पण हा केवळ डोळ्यात धूळ फेकण्याचाच प्रकार होता कारण नंतर ज्या शिवनाथ ठकुराल यांची नियुक्ती या पदावर झाली ते भाजपच्याच गोटातले होते, शिवाय आंखी दासपेक्षा त्यांचा पक्षाशी जास्त जवळचा संबंध असल्याचाही आरोप झाला होता.
ज्या समाजमाध्यमांनी एकीकडे आपलं आयुष्य सोपं केलं, कम्युनिकेशन सोपं केलं. त्याच समाजमाध्यमांमधून समाजात दुहीचं विषही पेरलं जातंय...हे काम अशा तंत्रज्ञानामुळे उलट जास्त सोपं आणि वेगानंही होतंय. त्यामुळेच इतर देशांत फेसबुकवर जो धाक आहे, तो आपल्याही देशात का नाही हा सवाल आहे..त्यादृष्टीनं उद्याची साक्ष महत्वाची असेल.