सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्याला फोन करणं पडणार महागात; भरावा लागणार लाखोंचा भुर्दंड, 'या' कंपनीची नवी पॉलिसी
Dream11 Unplug Policy: फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम11 नं आपल्या कर्मचार्यांसाठी एक अद्भूत धोरण आणलं आहे. कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातील कॉल आणि मेसेजची चिंता न करता सुट्टी घालवता येणार आहे.
Dream11 Unplug Policy: ऑफिसमध्ये आठवडाभर कामाचं प्रेशर, तणाव, टार्गेट सगळ्याचं टेन्शन घेतल्यानंतर आठवडाभरानं येतो तो रविवार. म्हणजे, प्रत्येक एम्प्लॉईच्या हक्काची सुट्टी किंवा विकली ऑफ. किंवा मग एखाद्या दिवशी आपण आपल्या कामासाठी बॉसच्या हातापाया पडून सुट्टी घेतो. अशातही कधी कधी ऑफिसमधून एक फोन येतो आणि बऱ्याचदा सुट्टीच्या सर्व प्लान्सवर पाणी फिरतं. सुट्टीचं प्लॅनिंग सोडून ऑफिसची कामं करावी लागतात. पण यावर एका कंपनीनं नवं फर्मान काढलंय. सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्याला फोन करणं बॉसला महागात पडू शकतं.
सुट्टीच्या दिवशी कामाशी संबंधित कॉल्स किंवा मेसेजचा त्रास सर्वांनाच नकोसा वाटतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत अनेकदा असं झालंच आहे. सुट्टीच्या दिवशी आपण काहीतरी मस्त बाहरे जाण्याचा प्लान करतो आणि नेमकं त्याचवेळी ऑफिसमधून एखाद्या महत्त्वाच्या कामासंदर्भात फोन येतो आणि सगळ्या प्लानवर पाणी फिरतं. हीच बाब लक्षात घेऊन, फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम 11 (Dream 11) नं एक नवं फर्मान काढलं आहे. यामुळे या कंपनीतील कर्मचारी भलतेच खूश आहेत. कारण कंपनीच्या नव्या फर्मानामुळं सुट्टीच्या दिवशी कोणत्याही कर्मचाऱ्याला कामाशी संबंधित कोणताही फोन कॉल किंवा मेसेज येणार नाही, हे जवळपास निश्चितच झालं आहे.
ड्रीम 11 नं जाहीर केलंय की, सुट्टीच्या दिवशी काम करण्यासाठी कोणीही कर्मचाऱ्याला त्रास दिला तर त्याला मोठा दंड आकारला जाईल. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्या चांगल्या पद्धतीनं घालवता याव्यात यासाठी कंपनीनं हे नवं धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Dream11 ची 'अनप्लग पॉलिसी'
Dream11 च्या 'अनप्लग पॉलिसी'मध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, कर्मचारी कामाशी संबंधित ईमेल (Email), मेसेज आणि कॉल्सशिवाय (Phone Calls) सुट्टी घालवू शकतील. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कर्मचारी एका आठवड्याच्या सुट्टीत त्यांच्या कामापासून पूर्णपणे दूर राहू शकतात आणि आपली सुट्टी निवांत घालवू शकतात. कंपनीनं हे धोरण LinkedIn वर जाहीर केलं आहे. लिंक्डइन पोस्टमध्ये, कंपनीनं लिहिलंय की, 'Dream11 मध्ये आम्ही प्रत्यक्षात 'Dreamster' लॉग ऑफ करतो.'
...तर आकारणार एक लाखाचा भुर्दंड
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी म्हटलंय की, 'अनप्लग' कालावधीत जो कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याशी संपर्क करेल त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. कंपनीतील प्रत्येकाला 'अनप्लग' वेळ मिळू शकतो. मग त्यांच्या सुट्टीचं काहीही कारण असो, कर्मचाऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी जर त्याला दुसऱ्या कर्मचाऱ्यानं फोन केला, तर इतर कोणतंही कारण विचारात न घेता, थेट फोन करणाऱ्या कर्मचाऱ्याला दंड ठोठावला जाईल. संस्थापकांच्या म्हणण्यानुसार, कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्यावर अवलंबून राहू नये यासाठी हे धोरण लागू करण्यात आलं आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
कंपनीच्या नव्या धोरणामुळे कर्मचारी खूप खूश असल्याचं सांगितलं जात आहे. ते म्हणतात की, कर्मचार्यांना कंपनीच्या सर्व यंत्रणा आणि गटांपासून वेगळं राहण्याची परवानगी देणं फायदेशीर आहे. आम्हाला सात दिवस ऑफिस कॉल, ईमेल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपचा त्रास होणार नाही. यामुळे आम्हाला काही चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. ड्रीम 11 च्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं की, कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्मचाऱ्यानं आनंदी आणि तणावापासून दूर राहणं गरजेचं असतं. कंपनीच्या या निर्णयामुळे हे सहज शक्य होईल.
अनेक वेळा कर्मचारी सुट्टीवर अशा ठिकाणी जातात, जिथे नेटवर्कची समस्या असते. अशा परिस्थितीत ऑफिसमधून आलेल्या कॉल्स आणि मेसेजला उत्तर देणं त्यांना अवघड जातं. ड्रीम11 चं नवं धोरण अशा कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आता ते कोणत्याही तणावात न राहता सुट्टी एन्जॉय करु शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
KYC Mandatory For Insurance: आता कोणताही विमा खरेदी करताना KYC कागदपत्रं बंधनकारक; वाचा सविस्तर