Donald Trump : शस्त्रसंधी केली नाही, पण भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळण्यास मदत केली; डोनाल्ड ट्रम्प यांचा यू टर्न
India Pakistan Ceasefire : डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भारतामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तानला अमेरिका एकाच तराजूत तोलतेय असा समज झाला आहे.

मुंबई : ऑपरेशन सिंदूरदमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव (India Pakistan Tension) शिगेला पोहोचलेला असताना चार दिवसांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यशस्वी मध्यस्थी करत शस्त्रसंधी घडवून आणल्याचं वक्तव्य केलं होतं. पण आता त्यांनी याच वक्तव्यावरून घुमजाव केला. भारत-पाकिस्तानमध्ये मी शस्त्रसंधी (India Pakistan Ceasefire) घडवून आणली नाही, पण तणाव निवळण्यास मदत केल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.
आपण या दोन देशांमध्ये मध्यस्ती केली नाही, पण या दोन देशांदरम्यान जो तणाव निर्माण झाला होतो तो कमी करण्यास मदत केली असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. कतरमधील अमेरिकेच्या लष्करी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानास डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. या आधी जवळपास पाच वेळा ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्ती केल्याचा दावा केला होता.
Donald Trump On India Pakistan : काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधीस संबंध ताणले गेले होते. या दोने देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती होती. या दोन देशांमध्ये अचानक मिसाईल्स हल्ले होऊ लागले आणि आम्ही ते बंद केले. किती वर्षे तुम्ही लढत राहणार? आता लढाई थांबवा. भारत आणि पाकिस्तानसमोर व्यापाराचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे दोन्ही देशांचे समाधान झाले.
Donald Trump On India Pakistan Ceasefire : शस्त्रसंधी केल्याचा या आधी दावा
भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर असताना या दोन देशांमध्ये शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. याची पहिली माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या प्रमुखांची चर्चा केल्यानंतर ते शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरुन भारतामध्ये नाराजी पसरल्याचं दिसून आलं. त्यानतंरही चार वेळा ट्रम्प यांनी हाच दावा केला. पण यावरुन भारताची नाराजी वाढताना दिसत असल्यानं आता त्यांनी घुमजाव केल्याची चर्चा आहे.
Donald Trump On Apple Production India : अॅपलने भारतात आयफोन तयार करु नये
भारत-पाक तणावात मध्यस्थी केल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथे एक मोठं वक्तव्य केलं. त्यांनी आयफोन तयार करणाऱ्या अपल कंपनीला भारतात आयफोन तयार न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी याबाबत ऍपलचे सीईओ टीम कुक यांच्याशी याबाबत चर्चादेखील केली.
भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही, भारत स्वतःचं पाहू शकतो असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं. अॅपल भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखत असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वक्तव्य आलं. सध्या अॅपलचं एकही आयफोन उत्पादन युनिट अमेरिकेत नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्यानंतर आयफोन कंपनी खरंच अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का हे पाहावं लागेल.























