(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आदिवासी आणि विधवा असल्यामुळेच राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हतं; सनातन धर्मावर टीका करत उदयनिधींची मोदी सरकावर निशाणा
Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma: द्रमुक नेते आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा सनातनला उद्ध्वस्त करण्याचं वक्तव्य केलं आहे. सनातन संपल्यानं जातिभेदही संपुष्टात येतील, असंही ते म्हणाले
Udhayanidhi Stalin Attack On Sanatan Dharma: तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी बुधवारी पुन्हा एकदा सनातन धर्म (Sanatan Dharma) आणि अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या (New Parliament Building) उद्घाटन सोहळ्यावरुन उदयनिधी स्टॅलिन यांनी मोदी सरकारला घेरलं आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला देशाच्या राष्ट्रपती द्रौपजी मुर्मू यांना आमंत्रित न केल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं नाही, कारण त्या विधवा आहे आणि आदिवासी समाजातील आहेत. यालाच आपण सनातन धर्म म्हणतो का? असं म्हणत उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रश्नही उपस्थित केला आहे.
यापूर्वीही उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. अशातच आता पुन्हा एकदा उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य केलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी मदुराई येथील एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवत राहू, असंही ते म्हणाले. सुमारे 800 कोटी रुपये खर्चून बांधलेलं नवं संसद भवन हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता, यावर उदयनिधी स्टॅलिन यांनी भर दिला. तरीही भारताच्या प्रथम नागरिक असूनही देशाच्या राष्ट्रपती द्रौपजी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं नाही. त्यांची आदिवासी पार्श्वभूमी आणि त्या विधवा असल्यानं त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं होतं, असंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले आहेत.
VIDEO | "Yesterday, some Hindi actors came and visited the new Parliament but our President was not invited. Why? Because Droupadi Murmu is from a tribal community. This is what we call 'Sanatan Dharma'," Tamil Nadu minister @Udhaystalin said at a meeting of DMK Youth Wing in… pic.twitter.com/K4JtYWNyz1
— Press Trust of India (@PTI_News) September 20, 2023
हा सनातन धर्म आहे? उदयनिधी स्टॅलिन यांचा सवाल
उदयनिधी स्टॅलिन पुढे बोलताना म्हणाले की, संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यांनी (भाजप) उद्घाटनासाठी तामिळनाडूतील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित केलं होतं, परंतु भारताच्या राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आलं नाही, कारण त्या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातील आहेत. हा सनातन धर्म आहे का? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, तसेच, आता विशेष अधिवेशनासाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही, असंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.
हिंदी अभिनेत्रीला आमंत्रण होतं, मग राष्ट्रपतींना का नाही? : उदयनिधी स्टॅलिन
उदयनिधी स्टॅलिन यांनी निदर्शनास आणून दिलं की, संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडलं गेले तेव्हाही हिंदी अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आलं होतं, मग देशाच्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना का आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं? राष्ट्रपतींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कारणांमुळे बाहेर ठेवण्यात आलं होतं. या घटना म्हणजे अशा निर्णयांवर 'सनातन धर्मा'चा प्रभाव असल्याचं द्योतकच, असा दावाही उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे.
लक्ष्य पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : उदयनिधी स्टॅलिन
उदयनिधी यांनी 'सनातन धर्मा'वर केलेल्या सुरुवातीच्या टीकेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या संदर्भातही वक्तव्य केलं. ते म्हणाले की, लोकांनी माझ्या डोक्याची किंमत ठरवून दिली आहे. मी अशा गोष्टींबद्दल कधीही काळजी करणार नाही. द्रमुकची स्थापना सनातनला संपवण्याच्या तत्त्वांवर झाली. आमचं ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
यापूर्वी सनातन धर्माबाबत काय म्हणालेले उदयनिधी स्टॅलिन?
"काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही, त्यांना नष्टचं केलं पाहिजे. आपण डेंग्यु, मच्छर, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करु शकत नाही तर त्याला नष्टचं करायचं असतं, त्याचप्रकारे सनातन देखील नष्ट केलं पाहिजे, कारण सनातन धर्म हा समाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे.", असं म्हणत तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गोंधळ उद्याप सुरू आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे, तर अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. पण उदयनिधी आपल्या वक्तव्यांवर ठाम आहेत. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे.