Petrol Price : अरविंद केजरीवालांचा धमाका, पेट्रोल दरात थेट 8 रुपयांची कपात, दिल्लीत लिटरचा भाव किती?
Petrol Price : राजधानीत पेट्रोल आठ रुपये स्वस्त, महाराष्ट्रात कधी होणार?
Petrol Price Today, Delhi VAT Decision, Delhi Petrol Updates : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीमधील नागरिकांना दिलासा दिलाय. केजरीवाल यांनी बुधवारी कॅबिनेट बैठकीत पेट्रोलवरील व्हॅट (value-added tax) कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर आठ रुपये स्वस्त झालं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोलवर असणारे व्हॅट 30 टक्क्यावरुन 19.40 टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज मध्यरात्रीपासून राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर आठ रुपये स्वस्त मिळणार आहे.
कोरोना महामारीसोबत इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली होती. इंधनदरवाढीवरुन केंद्र सरकारवरु टीका केली जात होती. जनतेची नाराजी पाहून दिवाळीमध्ये केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. केंद्राच्या निर्णानंतर अनेक राज्यांनी व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भाजपशासित राज्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. आता अरविंद केजरीवाल यांनीही पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय पंजाब, राज्यस्थान आणि छत्तीसगढ या भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांनीही व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारने अद्याप पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. राज्यातील विरोधीपक्ष भाजपने यावरुन महाविकास आघाडी सरकारवर अनेकदा टीकास्त्र सोडलं आहे. राजधानीमध्ये पेट्रोल आठ रुपये स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रातील व्हॅट कधी कमी होणार? असा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय.
लागोपाठ 27 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिवाळीपासून इंधनाच्या किंमती स्थिर आहेत. सध्या राजधानी दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लीटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर इतकी आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.