Coronavirus Update 2023: पुन्हा चिंता वाढणार? केरळमध्ये सापडला JN.1 हा कोविड 19चा सब व्हेरिएंट
Coronavirus Update 2023: INSACOG द्वारे सुरू असलेल्या नियमित निरीक्षणात केरळमध्ये कोरोनाचा JN.1 हा कोविड 19 विषाणूचा उपप्रकार आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली : केरळमध्ये (Kerala) भारतीय सार्स - सीओव्ही -2 जनुकीय अभ्यास समूह (INSACOG) द्वारे चालू असलेल्या नियमित देखरेखी दरम्यान, कोविड 19 (Covid 19) च्या JN.1 उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी आज नवी दिल्ली येथे ही माहिती दिली.
भारतीय सार्स - सीओव्ही -2 जनुकीय अभ्यास समूह (INSACOG) ही जनुकीय नमुने अभ्यास प्रयोगशाळांची साखळी असून ती भारतात जनुकीय अभ्यास दृष्टिकोनातून कोविड-19 चे निरीक्षण करत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या समूहाचा एक भाग आहे. कोविड -19 च्या संदर्भात निरिक्षण ठेवण्याच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इन्फ्लूएंझा सारखे आजार (ILI) आणि SARI च्या रूग्णांची कोविड-19 साठी चाचणी केली जाते आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने संपूर्ण जनुकीय अनुक्रम (WGS) साठी पाठवले जातात.
केरळमध्ये आढळून आला व्हेरिएंट
8 डिसेंबर 2023 रोजी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील काराकुलममध्ये आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह नमुन्यात हे प्रकरण आढळून आले. 18 नोव्हेंबर 2023 रोजी या नमुन्याची आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह चाचणी करण्यात आली होती. रुग्णाला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती आणि तो रुग्ण कोविड-19 मधून बरा झाला होता. गेल्या काही आठवड्यांपासून केरळ राज्यामध्ये कोविड-19 च्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा सारख्या आजारांच्या प्रकरणांमधील नमुन्यांच्या संख्येत वाढ हे याचे कारण आहे. यापैकी बहुतेक रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे आहेत आणि हे रुग्ण कोणत्याही उपचाराशिवाय त्यांच्या घरीच स्वतःहून बरे होत आहेत.
तज्ज्ञांनी काय म्हटलं?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, भारतीय SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) चे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा म्हणाले, "हे नोव्हेंबरमध्ये नोंदवले गेले होते आणि हा प्रकार वेगळा करण्यात आला होता. हा BA.2.86 चा उप-प्रकार आहे. आमच्याकडे JN.1 ची काही प्रकरणे आहेत. भारत निरीक्षण करत आहे आणि म्हणूनच आतापर्यंत कोणत्याही रुग्णालयात दाखल किंवा गंभीर आजाराची नोंद झालेली नाही. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन म्हणाले की, सात महिन्यांच्या कालावधीनंतर भारतात प्रकरणे वाढत आहेत. केरळमध्ये कोविडचे अहवाल आहेत, परंतु त्याची तीव्रता कमी असल्याचे दिसते.