(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Corona Update : सावधान! राजधानी दिल्लीत कोरोना वाढतोय, सरकार 'अॅक्शन मोड'मध्ये
Delhi Covid-19 Update : गेल्या 24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये 325 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे दिल्ली सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.
Delhi Covid-19 Update : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी कोरोनाचे (Corona Update) 300 हून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. संसर्ग दर वाढून 2.39 टक्के झाला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका दिवसात कोविड-19 (Covid-19) मुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन दिल्ली सरकार सतर्क झालं आहे.
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये 325 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे दिल्ली सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. दरम्यान, नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी कोरोनामुळे कोणाचाच मृत्यू झालेला नाही. अशातच दिल्लीमध्ये गेल्या 40 दिवसांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद काल (गुरुवारी) झाली आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये 3 मार्चनंतर सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, संसर्गाचा दर वाढून 2.39 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या एका रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे की, गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये 13576 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तर, 224 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीत एकूण 574 कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहत आहेत, तर 16 कोरोना बाधित रूग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून घटणाऱ्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत होणारी घट पाहता, डीडीएमएच्या बैठकीत सर्व कोरोना निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये मास्क लावणंही सक्तीचं नसल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तसेच, स्वतःच्या सुरक्षेसाठी लोकांनी मास्क वापरावं असं आवाहनही करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :