चीन-पाकिस्तान विशिष्ट 'मिशन' अंतर्गत भारताच्या सीमांवर तणाव निर्माण करतायेत? : राजनाथ सिंह
भारताची दोन्ही देशांना लागून सुमारे सात हजार किलोमीटरची सीमा आहे, जिथे जवळपास रोजच तणाव आहे.
नवी दिल्ली: चीन आणि पाकिस्तान एका विशिष्ट 'मिशन' अंतर्गत भारताच्या सीमांवर तणाव निर्माण करत आहेत का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी या षडयंत्रकडे लक्ष वेधलं. राजनाथ सिंह म्हणाले की, असं दिसून येत आहे की चीन आणि पाकिस्तान एका ‘मिशन’ अंतर्गत भारताच्या सात हजार किमी लांबीच्या सीमेवर तणाव निर्माण करत आहेत. बीआरओने तयार केलेल्या 44 पुलांच्या उद्घाटन प्रसंगी संरक्षणमंत्री बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले की, आमच्या उत्तर आणि पूर्वेकडील सीमेवर (म्हणजे चीनच्या सीमेवर) निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी सर्वांना माहिती आहे. आधी पाकिस्तान आणि आता चीनकडून एका मिशन प्रमाणे सीमेवर वाद निर्माण केले जात आहेत. भारताची दोन्ही देशांना लागून सुमारे सात हजार किलोमीटरची सीमा आहे, जिथे जवळपास रोजच तणाव आहे.
कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळ आहेच त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून सरहद्दीवर तणावाची स्थिती निर्माण केली जात आहे. त्यांचा देशाला सामना करावा लागत आहे. असे वाद सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकासाची कामे होत आहेत आणि ऐतिहासिक बदल घडवून आणले जात आहेत.
गेल्या पाच महिन्यांपासून भारताची वास्तविक नियंत्रण रेषा अर्थात एलएसीवर चीनशी संघर्ष सुरु आहे. यापूर्वी पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराकडून युद्धबंदीचे उल्लंघन आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीमुळेही पाकिस्तानचे भारताचे संबंध कायम तणावाचे राहिले.
सीमा मार्ग संघटनेने बांधलेले 44 पूल राष्ट्राला केले समर्पित
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 44 प्रमुख कायमस्वरूपी पूल राष्ट्राला समर्पित केले. देशाच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्येकडील संवेदनशील सीमा भागामध्ये रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून कायमस्वरूपी संपर्क व्यवस्था केल्यामुळे नवीन युगाची नांदी झाली आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरूणाचल प्रदेशातल्या नेचिफू बोगद्याचा शिलान्यास केला. या बोगद्यामुळे अतिदुर्गम प्रदेशातल्या जनतेला संपर्क सुविधा मिळू शकणार आहे त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा बोगदा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. आज देशाला समर्पित करण्यात आलेले 44 पूल सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.