Cyclone Mocha : अस्मानी संकट! वर्षातील पहिले चक्रीवादळ धडकणार, बंगाल - ओडिसाला हाय अलर्ट जारी
Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतानाच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. 6 मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे
Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात 9 मेपर्यंत चक्रीवादळ (Mocha Cyclone) निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यामुळे मच्छीमारांनी या भागात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळ मध्य बंगाल उपसागराच्या दिशेने उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. यामुळे आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे 2023 सालातील हे पहिले चक्रीवादळ आहे.
भारतीय हवामान विभागानुसार काही माॅडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दाखवत असल्याची माहिती आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची हवामान विभागाने ही महिती दिली आहे. 'मोचा' चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ 40-50 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्यचा अंदाज आहे.
'मोचा' नावाची चर्चा का?
जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्य देशांनी स्वीकारलेल्या नामकरण प्रणाली अंतर्गत या चक्रीवादळाला 'मोचा' असे नाव दिले जाईल. येमेनने या चक्रीवादळाचे नाव 'मोचा' या आपल्या लाल समुद्राच्या किनार्यावरील बंदर शहराच्या नावावर सुचवले आहे.
चक्रीवादळाला नाव कशासाठी ?
- प्रत्येक चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे.
- त्याच्या समुद्रावरील विकासाविषयी जनजागृती व्हावी.
- एकाच वेळी दोन किंवा अधिक चक्रीवादळे निर्माण झाल्यास संभ्रम निर्माण होऊ नये.
- चक्रीवादळ स्मरणात राहावे.
- चक्रीवादळाविषयीची माहिती कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी.
वादळांना नावं देण्याची सुरुवात कशी झाली?
उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे यासाठी 2004 पासून आयएमडीच्या पुढाकाराने अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे नामकरण करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी चक्रीवादळांच्या प्रभावाखाली असणाऱ्या आठ देशांनी सुचवलेल्या एकूण 64 नावांच्या यादीचा वापर करण्यात आला. या यादीमधील सर्व नावे चक्रीवादळांना देण्यात आली. इंग्रजी अद्याक्षरांनुसार सर्व देशांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांनी सुचवलेली नावे 13 रकान्यांमध्ये मांडण्यात आली आहेत. नव्याने तयार होणाऱ्या चक्रीवादळाला रकान्यातील देशांच्या क्रमानुसार एका पाठोपाठ एक नाव देण्यात येईल. 13 देशांनी सुचवलेल्या पहिल्या नावांचा रकाना संपला की, दुसऱ्या रकान्यातील नावे देशांच्या क्रमवारीनुसार देण्यात येतील.