आधी कोरोना.. मग डेल्टा, आता ओमायक्रॉन; आणखी गंभीर रुपं घेणार कोरोना, तज्ज्ञांचा दावा
Covid-19 Updates : कोरोनाचा धोका आणखी वाढणार? Omicron नंतर आणखी नवीन प्रकार येणार, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
Covid-19 Updates : सर्वात आधी कोरोना, त्यानंतर डेल्टा आणि आता ओमायक्रॉन... कोरोना महामारीमध्ये कोविड-19 च्या टप्प्याटप्प्यानं आलेल्या या व्हेरियंट्सनी संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली. पण कोरोनाच्या या नवनव्या रुपांचा प्रवास इथेच थांबणार नाही. म्हणजेच, सध्या नव्यानं आलेला ओमायक्रॉन व्हेरियंट हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नसून कोरोना आणखी काही रुपं घेऊ शकतो, असा दावा तज्ज्ञांनी नव्या संशोधनातून केला आहे. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासूनच याबद्दल माहिती देणारी दररोज नवनवी संशोधनं समोर येत आहेत. अशातच आता समोर आलेल्या नव्या संशोधनामुळं सर्वांचीच झोप उडाली आहे.
तज्ज्ञांचा दावा आहे की, प्रत्येक संसर्गजन्य व्हायरसमध्ये म्युटेशन होतंच. त्यामुळे आता धुमाकूळ घालत असलेला नवा व्हेरियंट ओमायक्रॉन स्वतःचं रुप बदलू शकतो. लस आणि इतर पदार्थांतून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती भेदून व्यक्तींना ओमायक्रॉनची बाधा होत असल्याचं दिसून येत आहे. याचाच अर्थ असा की, हा व्हायरस अधिकाधिक लोकांमध्ये पुढेही विकसित होऊ शकतो.
दरम्यान, कोरोनाच्या पुढच्या व्हेरियंटमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणं दिसून येतील, याबाबत काहीच माहिती नसल्याचं तज्ज्ञांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ओमायक्रॉनचा सीक्वेल एक सामान्य की, गंभीर आजार असेल आणि कोरोना प्रतिबंधक लस यावर कितपत फायदेशीर ठेरल, याबाबत सध्यातरी कोणतीहीच माहिती उपलब्ध नाही.
वेगानं पसरतो ओमायक्रॉन
बोस्टन युनिवर्सिटीतील विशेषज्ञ लियोनॉर्डो मार्टिनस म्हणाले की, वेगानं पसरत असल्यामुळं ओमायक्रॉनला आणखी म्युटेशन तयार करण्याचा वेळ मिळेल. ज्यामुळे आणखी जास्त व्हेरियंट्स येण्याची शक्यता वाढणार आहे. मध्य नोव्हेंबरमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आल्यानंतर हा जगभरात पुढच्या दिशेनं पसरतो. संशोधनातून सिद्ध झालं आहे की, ओमायक्रॉन, डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत चारपट अधिक वेगानं पसरतो.
ते म्हणाले की, ओमायक्रॉन ब्रेकथ्रू संसर्गासाठीही कारणीभूत ठरतो. यामुळे लस घेतलेल्या लोकांना देखील संसर्ग झाला आहे. याशिवाय ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, अशा लोकांनाही या व्हायरसची बाधा होत आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ डॉ. स्टुअर्ट कॅम्पबेल म्हणाले की, वारंवार आणि दीर्घकाळ संसर्ग झाल्यामुळे व्हेरियंटचा नवीन प्रकार उद्भवण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, 385 मृत्यू
देशात कोरोनाचा अनियंत्रित वेग कायम आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूचे 2 लाख 58 हजार 89 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि भारतात गेल्या 24 तासात 1 लाख 51 हजार 740 बरे झाले आहेत. तर, 385 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांसह देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 16 लाख 56 हजार 341 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 86 हजार 451 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 209 इतकी झाली आहे. भारतात लसीकरण मोहीम वेगाने चालविली जात आहे. आतापर्यंत 157 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात कोरोना संसर्गाचे 41, 327 नवे रुग्ण आढळून आले असून आणखी 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 42,462 संसर्गाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 40,386 कोरोनारुग्ण संसर्गमुक्त झाले असून, आतापर्यंत राज्यात 68,00,900 लोक बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,65,346 इतकी आहे. राज्यातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या 72,11,810 झाली असून मृतांची संख्या 1,41,808 वर पोहोचली आहे. एका दिवसात ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ नवे रुग्ण आढळल्याने एकुण ओमायक्रॉनबाधितांची संख्या 932 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना संसर्ग मृत्यूदर 1.96 टक्के आहे तर संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus New Cases : कोरोनाचा वाढता धोका! गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, 385 मृत्यू
- देशात कुणावरही कोरोना लसीची सक्ती नाही, केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )