Coronavirus India : देशात 24 तासांत एक लाख 28 हजार कोरोनाबाधित; पॉझिटिव्हीटी दर 8 टक्क्यांपेक्षा कमी
Coronavirus India : देशभरात मागील 24 तासामध्ये एक लाख 27 हजार 952 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
Coronavirus Cases : देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात एक लाख 27 हजार 952 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 1059 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गुरुवार-शुक्रवारच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. शुक्रवारी 24 तासांमध्ये एक लाख 49 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
देशात संसर्गाचा पॉझिटीव्हीटी दर हा 7.98 टक्के इतका झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 31 हजार 648 इतकी झाली आहे. तर, कोरोनामुळे 5 लाख 1 हजार 114 जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील 24 तासांमध्ये दोन लाख 30 हजार 814 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 79 हजारजणांनी कोरोनावर मात केली आहे.
आतापर्यंत 169 कोटी डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोनाच्या 169 कोटी डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी 47 लाख 53 हजार 81 लशीचे डोस देण्यात आले.
महाराष्ट्रात काय स्थिती?
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाच्या 13 हजार 840 नव्या रुग्णांची भर पडली, तर 81 जणांचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या 24 तासात 27 हजार 891 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात शुक्रवारी एकही ओमायक्रॉन बाधिताची नोंद करण्यात आली नाही. राज्यात आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1701 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 74 लाख 91 हजार 759 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.26 टक्के आहे. सध्या राज्यात 8 लाख 52 हजार 419 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.