Coronavirus Updates : काळजी घ्या! देशात एकाच दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत 38 टक्क्यांनी वाढ
Coronavirus Updates : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून आदल्या दिवशीच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे,.
Coronavirus Updates : भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासात देशात 12 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्याआधीच्या दिवसाशी तुलना करता कोरोनाबाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ आदल्या दिवशीच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत 38.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या देशात 58 हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर, मागील 24 तासात 11 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मागील एक दिवसात एकूण 7624 बाधितांना आजारांवर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मागील 24 तासात 12,213 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,32,57,730 पर्यंत पोहचली आहे. तर, आतापर्यंत 4,26,74,712 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या 5,24,803 इतकी झाली आहे.
आदल्या दिवशी,15 जून रोजी प्रसिद्ध केलेल्या आकेडवारीनुसार, देशात सुमारे 8 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या ही सातत्याने 8 हजारांच्या घरात होती. मात्र आता कोरोनाच्या रुग्ण संख्येत अचानक मोठी वाढ दिसून आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे.
भारतात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण जोरात सुरू आहे. आतापर्यंत 1,95,67,37,014 जणांना कोरोना लशीचा डोस देण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने वाढताना दिसत असल्याने चिंता वाढली आहे. बुधवारी, राज्यात एकूण 4024 रुग्णांची भर पडली आहे. तर, 3028 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बुधवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना मृत्यू दर 1.86 टक्के इतका झाला आहे.
राज्यात बुधवारी ओमायक्रॉनच्या बीए 5 व्हेरिएंटच्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणचे आहेत. हे सर्व रुग्ण 19 ते 36 या वयोगटातील असून सर्वजण महिला आहेत.
मुंबईत बुधवारी 2293 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर 1764 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 53 हजार 965 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे.
नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ, जंबो सेंटर पुन्हा सुरू
गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. याचा परिणाम नवी मुंबईतही जाणवू लागला असून दिवसाला 250 ते 300 कोरोना रूग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता महानगरपालिकेकडून सिडको एग्झिबिशनमधील जंबो कोरोना सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. कोरोना लक्षणे आढळून आलेल्या रूग्णांचे घरातच विलगीकरण होत नसेल तर त्यांना या कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले जात आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी चाचणीची संख्या वाढविण्यात आली आहे.