Coronavirus Cases Today : देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका! तर कोरोनाच्या 7 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 7 हजार 495 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव वाढत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात आता ओमायक्रॉनबाधितांची संख्याही वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 7 हजार 495 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 236 रुग्ण समोर आले आहेत. जाणून घेऊयात देशभरातील कोरोनाची सद्यस्थिती...
आतापर्यंत 4 लाख 77 हजार 759 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 78 हजार 190 आहे. तसेच या महामारीमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 4 लाख 77 हजार 759 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (बुधवारी) 6 हजार 960 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 8 हजार 926 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 139 कोटींहून अधिक डोस
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रभावी लसीचे 139 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (बुधवारी) 70 लाख 17 हजार 671 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंतचा लसीकरणाचा आकडा 139 कोटी 69 लाख 76 हजार 774 डोस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 236 ओमायक्रॉनबाधित
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा सर्वात घातक व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सध्या देशात घातक व्हेरियंट ओमायक्रॉनचे 236 रुग्ण आहेत. राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
भारतात ओमायक्रॉनची सध्याची स्थिती :
- एकूण रुग्ण : 236
- एकूण रिकव्हरी : 104
- किती राज्यात संसर्ग : 16
कोणत्या राज्यात किती रुग्ण?
राज्य | ओमायक्रॉनबाधित | बरे झालेले ओमायक्रॉनबाधित |
महाराष्ट्र | 62 | 35 |
दिल्ली | 64 | 23 |
तेलंगाणा | 24 | 0 |
राजस्थान | 21 | 19 |
कर्नाटक | 19 | 15 |
केरळ | 15 | 0 |
गुजरात | 14 | 4 |
जम्मू | 3 | 3 |
आंध्रप्रदेश | 2 | 1 |
ओदिशा | 2 | 0 |
उत्तर प्रदेश | 2 | 2 |
चंदिगढ | 1 | 0 |
लडाख | 1 | 1 |
तामिळनाडू | 1 | 0 |
उत्तर प्रदेश | 1 | 0 |
पश्चिम बंगाल | 1 | 1 |
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे सर्व राज्यांना पत्र
आरोग्य विभागाकडून सर्व राज्यांचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट तीन पटींनी अधिक वेगानं पसरतो. त्यामुळे आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. परंतु, अनेक ठिकाणी नागरिक निष्काळजीपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच केंद्रानं राज्यांना तिसरी लाट रोखण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोविड-19 आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं पत्र लिहिलं आहे. सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासही सांगितलं आहे.
राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (बुधवारी) 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 953 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनच्या एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 65 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 35 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
- कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनंतर ओमायक्रॉनला कशी मात द्याल?, अदर पुनावालांनी भन्नाट पोस्ट करत दिली माहिती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह