Coronavirus Cases India : देशात कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम; गेल्या 24 तासांत 360,960 नव्या रुग्णांची नोंद
Coronavirus Cases India 28 April : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. 25 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत अनुक्रमे 3.52 लाख, 3.23 लाख, 3.60 लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. हा आकडा जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
Coronavirus Cases India 28 April : संपूर्ण जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अशातच भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 360,960 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, 2,61,162 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी सोमवारी देशात 323,023 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
गेल्या तीन दिवसांत देशात 1 मिलियनहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 25 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत अनुक्रमे 3.52 लाख, 3.23 लाख, 3.60 लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. हा आकडा जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 79 लाख 97 हजार 267
एकूण मृत्यू : 2 लाख 1 हजार 187
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 48 लाख 17 हजार 371
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 29 लाख 78 हजार 709
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 14 कोटी 78 लाख 27 हजार 367 डोस
महाराष्ट्रात 67, 752 रुग्ण बरे होऊन घरी, 66,358 नवीन रुग्णांचे निदान
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. मंगळवारी 66 हजार 358 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात काल 895 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.
मंगळवारी 67 हजार 752 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 36 लाख 69 हजार 548 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 895 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.05 टक्के एवढा आहे.
मुंबई गेल्या 24 तासात 4014 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 4014 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल 8240 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 55 हजार 101 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 87 टक्के आहे. सध्या 66 हजार 045 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 68 दिवस आहे. कोविड रुग्णांचा दर 1.01 टक्के आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार? सरकारमधील मंत्र्यांनीच दिले संकेत
राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आता लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली पण तिसरी लाट येण्याआधी सरकारला राज्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :