Covid19 : सणासुदीच्या काळात आनंदाची बातमी, तब्बल तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर, सक्रिय रुग्णांची संख्याही घटली
India Corona Updates : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट ही दिलासादायक बाब आहे.
Coronavirus Cases Today : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या घसरली आहे. देशात तब्बल तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. दोन वर्षांनंतर यंदा कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त होत देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट ही आणखी एक दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 2,152 रुग्णांची घट झालीय. रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. ही जून महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत झालेली सर्वाधिक घट आहे. याआधी 07 जून रोजी देशात 7,233 रुग्णांची नोंद झाली होती आणि त्यानंतर कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळाला.
सक्रिय रुग्णांची संख्या 65 हजार 732 इतकी
देशातील कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 65 हजार 732 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. यामधील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणं असणारे आहेत. देशात गेल्या 24 तासांत 22,031 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 38 लाख 25 हजार 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात 1012 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात 810 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी दिवसभरात एकूण 1012 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,37, 588 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.03 टक्के इतकं झालं आहे.
मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण
महाराष्ट्रात एकूण 11472 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4728 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2586 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1098 दिवसांवर गेला आहे.
मुंबईत सोमवारी 351 रुग्णांची नोंद
मुंबईत 351 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 589 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,19,250 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.