Corona Variant : ऐन दिवाळी कोरोनाचा वाढता धोका, ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची दहशत; XBB की BF.7? कोण अधिक धोकादायक?
Corona New Variant : ऐन दिवाळी कोरोनाचा वाढता धोका, ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची दहशत; चीन, डेनमार्क, इंग्लंडमध्येही वाढता कहर, XBB की BF.7 कोणता व्हेरियंट अधिक धोकादायक आहे.
BF.7 vs XBB : ऐन सणासुदीच्या काळात देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. राज्यात कोरोनाच्या तीन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. एकीकडे दोन वर्षांनंतर कोरोना नियमांशिवाय दिवाळी साजरी करण्यासाठी लोकांमध्ये उत्साह आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने डोकं वर काढलं आहे. भारतासह चीन, इंग्लंडमध्ये नवीन व्हेरियंट वेगाने पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या तीन व्हेरियंटने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे तीन नवीन सबव्हेरियंट आढळून आले आहेत. BF.7, XBB आणि BA.5.1.7 हे नवीन व्हेरियंट आढळले आहेत.
कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे हे तीन नवे व्हेरियंट ओमायक्रॉन प्रमाणेच अधिक संसर्गजन्य असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. कोरोनाचे नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन व्हेरियंटविरुद्ध लढण्यासाठी सरकारही गंभीर झालं आहे. मंगळवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविड चाचण्यावर भर देण्यास सांगितलं आहे. तसेच अधिकाऱ्यांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केलं आहे.
XBB व्हेरियंट
नवीन कोरोनाचा XBB व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूच्या BA.2.75 आणि BA.2.10 या म्यूटेशनचा मिळून तयार झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा प्रकार सर्वाधित संसर्गजन्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्या देशामध्येही XBB व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीमुळे शरीरात तयार झालेल्या प्रतिकारशक्तीलाही नवे व्हेरियंट चकवा देत आहेत. XBB व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे. या विषाणूची लागण झालेल्यांमध्ये आतापर्यंत अंगदुखी हे लक्षण प्रामुख्याने आढळलं आहे.
BF.7 व्हेरियंट
BF.7 हा प्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटच्या BA.5 चा सबव्हेरियंट आहे. हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीलाही चकवा देत असल्याने अधिक संसर्गजन्य आहे. हा व्हेरियंटही अत्यंत संसर्गजन्य आणि अधिक धोकादायक आहे. BF.7 हा व्हेरियंट सुरुवातीला चीनमध्ये आढळून आला. आता हा व्हेरियंट बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेनमार्क आणि इंग्लंडमध्येही वेगाने पसरताना दिसत आहे. BF.7 विषाणूचं अंगदुखी हे मुख्य लक्षण असून रुग्णाला खोकला, थकवा ही लक्षणेही जाणवतात.
भारतातही ओमायक्रॉनच्या BA.5 व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. BA.5 विषाणूचा पहिला रुग्ण गुजरातच्या अहमदाबादमध्ये आढळला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून सध्या त्याची तब्येत स्थिर आहे. जगभरात कोरोनाचे नवे व्हेरियंट वेगाने पसरत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.
कोणता प्रकार अधिक धोकादायक आहे?
शास्त्रज्ज्ञांच्या मते, BF.7 प्रकारांचा संसर्ग दर खूप जास्त आहे. हा अधिक संसर्गजन्य आहे, पण ओमायक्रॉन आणि त्याच्या सबव्हेरियंटची लक्षणे अतिशय सौम्य आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र आरोग्यतज्ज्ञांनी लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना नव्या व्हेरियंटपासून सावध राहण्याची आणि अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
ओमायक्रॉनच्या XBB प्रकाराची लक्षणे सौम्य आहेत, परंतु या विषाणू अधिक संसर्गजन्य आहे, यामुळे कोरोनाची रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू शकते, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
OMICRON XBB प्रकार : ते किती प्राणघातक आहे?
सध्या सणासुदीचा काळ सुरू असून रस्त्यावर, दुकानं, बाजारपेठा आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत, पुढील तीन ते चार आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटच्या रुग्णांमधअये XBB विषाणूच्या रुग्णांचं प्रमाण सुमारे 7 टक्के आहे. XBB विषाणू फार कमी वेळेत मोठ्या संख्येने संक्रमित होऊ शकतो. XBB विषाणूमध्ये रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता खूप जास्त आहे.
भारतात 'येथे' आढळले XBB विषाणूचे रुग्ण
- महाराष्ट्र : 18 रुग्ण
- ओडिशा : 33 रुग्ण
- पश्चिम बंगाल : 17 रुग्ण
- तामिळनाडू : 16 रुग्ण