Corona Virus | चिकन खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही, सोशल मीडियावरील अफवांचं केंद्र सरकारकडून खंडन
चिकन खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांचं केंद्र सरकारने खंडन केलं आहे. यामुळे चिकन-मटणप्रेमींसह विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घालतं आहे. भारतात या कोरोना व्हायरसने चिकन व्यावसायिकांची डोकेदुखी वाढवली आहे. चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे चिकन खाणे टाळावे, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचा फटका चिकन विक्रीवर होत आहे. मात्र चिकनमध्ये कोरोना व्हायरस नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांचं केंद्र सरकारने खंडन केलं आहे. देशभरामध्ये चिकनच्या दरात होत असलेली घसरण पाहून केंद्र सरकारला लेखी स्पष्टीकरण दिलं आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्ग होऊन आतापर्यंत 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हजारहून अधिक नागरिकांचा या कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनच्या आरोग्य आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, हुबेई प्रांतामध्येच अजूनही या विषाणूंचा सर्वाधिक संसर्ग आहे. रविवारी (9 फेब्रुवारी) या प्रांतामधील 91 नागरिकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय अनहुईमध्ये दोन, हेलोंगजियांग, जिंग्सी, हैनान आणि गान्सू या प्रांतांमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Corona Virus | चीनमध्ये मृतांचा आकडा 1000 पार; 40 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग
चीनमधील कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले 3062 रुग्ण नव्याने सापडले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या 40 हजारांवर गेली आहे. रविवारी 4 हजारहून अधिक नवे संशयित आढळून आले आहेत. त्यातील 296 रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. चीनमधील कोरोना व्हायरसच्या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक चीनमध्ये दाखल होणार आहे.
कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या :