Corona Delta Variant : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला 'डेल्टा व्हेरिएंट' नेमका काय आहे?
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. कप्पा आणि डेल्टा हे कोरोनाचे व्हेरिएंट भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहेत.

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत जरी कमी झाली असली तरी ती अद्याप चिंताजनक अशी आहे. महत्वाचं म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा कोरोनाचा व्हेरिएंट जबाबदार आहे असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
काय आहे डेल्टा व्हेरिएंट?
जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे.
यामध्ये डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे.
ग्रीक अल्फाबेट्सवरुन नामकरण
कप्पा आणि डेल्टा ही दोन नावं ग्रीक अल्फाबेट्सवरुन देण्यात आली आहेत. या आधीच्या अनेक व्हेरिएंटना ग्रीक अल्फाबेट्सची नावं देण्यात आली आहेत. या मालिकेतील पहिला व्हेरिएंट हा ब्रिटनमध्ये सापडला होता, त्याला जागतिक आरोग्य संघटनेने 'अल्फा' असं नाव दिलं आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या व्हेरिएंटला 'बीटा' असं नाव देण्यात आलं तर ब्राझिलमध्ये सापडलेल्या व्हेरिएंटला 'गॅमा' अस नाव देण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol Diesel Hike : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, भारतात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
- India Corona Cases : देशात गेल्या 24 तासांत 1.32 लाख नवे कोरोनाबाधित; तर 2713 रुग्णांचा मृत्यू
- RBI Monetary Policy 2021: व्याजदर 'जैसे थे', 9.5 टक्के विकास दराचा अंदाज, RBI चे आर्थिक धोरण जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
