पाकिस्तानच्या बॉम्बिंगला न डगमगता भुज विमानतळाची धावपट्टी दुरुस्त करणारे स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक
भुज विमानतळावर जवळपास 14 दिवस भुज येथे पाकिस्तानने हल्ले सुरु ठेवले. या 14 दिवसात पाकिस्तानकडून 35 हवाई हल्ले झाले. यामध्ये 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटने हल्ले करण्यात आले.
मुंबई : बॉलिवूड स्टार अजय देवगणच्या आगामी 'भुज :द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा अशी तकडी स्टारकास्ट आहे. मात्र ज्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे, असे शूरवीर भारतीय हवाई दलाचे तत्कालीन अधिकारी विजय कर्णिक हे रिअल हिरो आहेत. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात विजय कर्णिक यांनी गाजवलेलं असामान्य शौर्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं जात आहे.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान विजय कर्णिक हे स्क्वाड्रन लीडर होते. कच्छ-गुजराथमधील भुज विमानतळावर ते कार्यरत होते. पाकिस्तानकडून झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे भुज येथील धावपट्टी पूर्णत: उद्ध्वस्त झाली होती. मात्र ती स्थानिक महिलांच्या मदतीने विजय कर्णिक यांनी दुरुस्त केल्याने त्याठिकाणी भारतीय वायुसेनेची विमाने तेथे उतरू शकले. मात्र जितल्या सहजतेने हे सांगितलं जातंय हे काम तितकं सोपं नव्हतं.
पाकिस्तानने पूर्ण रणनितीनिशी 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाने ऑपरेशन 'चंगेज खान' सुरू केले. भारताविरुद्धची ही कारवाई युद्धाची सुरुवात होती. पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या 11 विमानतळांना लक्ष्य केलं होतं. जेणेकरुन भारताची हवाई ताकद कमकुवत व्हावी. यामध्ये अमृतसर, अंबाला, आग्रा, अवंतीपोरा, बीकानेर, हलवारा, जोधपूर, जैसलमेर, पठाणकोट, भुज, श्रीनगर आणि उत्तरलाई येथे पाकिस्तानने हल्ले चढवले होते. भारतील हवाई दल जर युद्धादरम्यान कमकुवत असेल तर याचा फायदा नक्की होईल, असा पाकिस्तानचा भ्रम होता.
भुज विमातळावर 14 दिवस हल्ले सुरु होते
पाकिस्तानने भुज येथील हवाई दलाच्या तळावर अनेक हल्ले केले. जवळपास 14 दिवस भुज येथे पाकिस्तानने हल्ले सुरु ठेवले. या 14 दिवसात पाकिस्तानकडून 35 हवाई हल्ले झाले. यामध्ये 92 बॉम्ब आणि 22 रॉकेट डागण्यात आले. मात्र पाकिस्तान समोर झुकेल तो भारतीय जवान कसला. पाकिस्तानला जशास तसं उत्तर तर द्यायचंच आहे. मात्र पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेली भुज धावपट्टी दुरुस्त होणे गरजेचं आहे, हे स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक चांगलंच जाणून होतं.
300 महिलांच्या मदतीने 72 तासांत धावपट्टी दुरुस्त
त्यामुळे कधीही येणारे बॉम्ब आणि रॉकेट हल्ले यांची चिंता न करता काहीही करुन धावपट्टी सुरु करायची असा धाडसी निर्णय विजय कर्णिक यांनी घेतला. मात्र हे काम केवळ हवाई दलाचे अधिकरी आणि जवान मिळून होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यावेळी जवळच्या माधापर गावांतील 300 महिलांची मदत घेण्याचे ठरवले. एकूण 300 महिलांनी 72 तासांत ही धावपट्टी तयार केली.
एकीकडे पाकिस्तानकडून होणारे हल्ले रोखायचे आणि धावपट्टीचं कामही सुरु ठेवायचं, असा प्लान होता. विजय कर्णिक यांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांसह 50 वायुसैनिक आणि 60 संरक्षण सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पाकिस्तानीकडून हल्ल्यांना प्रत्युत्तर देत भुजच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरु ठेवलं. त्यामुळे भुज विमानतळाची धावपट्टी पुन्हा दुरुस्त झाली. दुरुस्तीमुळे, भारतीय वायुसेनेची विमाने तेथे उतरू शकली आणि मग येथून पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. 1971 च्या युद्धा दरम्यान स्क्वाड्रन लीडर यांनी दाखवलेले शौर्य आणि प्रसंगावधान यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच भुज येथील धावपट्टी सुरु झाल्याने भारतीय हवाई दलाची विमानं तिथे उतरु शकली आणि पाकिस्तान बॅकफूटवर गेला.
विजय कर्णिक यांची कारकिर्द
विजय कर्णिक यांचा जन्म नागपूर येथे झाला होता. त्यांनी शालेय शिक्षण नागपुरात घेतले, ते सायन्समध्ये पदवी घेतली आहे. विजय कर्णिक 26 मे 1962 मध्ये भारतीय हवाई दलात रुजू झाले होते. भारत- पाकिस्तान युद्धा दरम्यान ते भुज येथे स्क्वॉड्रन लीडर म्हणून कार्यरत होते. पुढे 14 ऑक्टेबर 1986 रोजी ते हवाई दलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झाले.