Constitution Day 2022: PM मोदी म्हणाले, संविधान आपली मोठी ताकद; सरन्यायाधीशांकडून संविधानिक मूल्ये वाचवण्याचे आवाहन
Constitution Day 2022: भारतीय संविधान ही भारताची मोठी ताकद असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. तर, सर्वच न्यायाधीशांनी घटनात्मक मूल्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन सरन्यायाधीशांनी केले.
Constitution Day 2022: भारतीय संविधान ही देशाची प्रगती पुढे नेणारी मोठी ताकद असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केले. संविधान दिवसानिमित्ताने (Constitution Day 2022) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D.Y.Chandrachud) सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते चार डिजीटल कोर्टाची सुरुवात करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आपली राज्यघटना मुक्त, भविष्यवादी आणि प्रगतीशील विचारांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या राज्यघटनेचा आत्मा युवाकेंद्रित आहे. आपल्या देशाचा विकास पुढे नेण्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर असल्याचे त्यांनी म्हटले. संविधान देशाची प्रगती पुढे नेणारी सर्वात मोठी ताकद आहे. विविध सरकारी संस्था आणि न्यायपालिकेला विनंती करतो की त्यांनी आपल्या तरुणांमध्ये संविधानाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. राज्यघटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी युवकांनी वादविवाद, चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. डिजीटल कोर्टाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांनी या प्रयोगाचे कौतुक केले.
सरन्यायाधीस धनंजय चंद्रचडू यांनी आपल्या भाषणात न्यायमूर्तींनी संविधानिक मूल्याचे रक्षण करण्याचे आवाहन केले. एखादी संस्था लोकशाही पद्धतीने कार्य करते तेव्हाच ती वेळेनुसार विकसित होते. त्यामुळे जिल्हा पातळीपासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व सुनिश्चित करण्याच्या घटनात्मक दृष्टीकोनावर विचार करणे आवश्यक असल्याचे चंद्रचूड यांनी म्हटले. भारतीय राज्यघटना ही कायदेशीर मजकूर नाही. तर, तर मानवी संघर्ष आणि बलिदानाची कथा आहे. स्त्री, दलित, दिव्यांगांसह सर्वच उपेक्षित घटकांवरील अन्याय दूर करण्यासाठीची गोष्ट असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले.
भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाला मान्यता दिली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. केंद्र सरकारने 2015 पासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात विस्तृत संविधान आहे. यामध्ये 25 भाग, 448 अनुच्छेद आणि 12 परिशिष्ट आहेत. मूळ संविधानात 395 आर्टिकल आणि 9 परिशिष्ट होते. भारतीय संविधानाचं सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे हे तयार करताना सांस्कृतिक, धार्मिक आणि भौगोलिक विविधता लक्षात घेतली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: