(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार, सोनिया गांधींनी केलं अभिनंदन
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) सुत्रे हाती घेतली.
Congress President Mallikarjun Kharge : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) सुत्रे हाती घेतली. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींसह (Sonia Gandhi) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारण्यापूर्वी खर्गे यांनी राजघाट इथं महात्मा गांधी, शांतीवन इथं जवाहरलाल नेहरु आणि शक्तीस्थळ इथं जाऊन इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
यावेळी सोनिया गांधी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. याआधीही काँग्रेसला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण मला खात्री आहे की, आम्ही अडचणींवर मात करु असे मत यावेळी सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. दरम्यान, अध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यापूर्वी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर खर्गेंच्या अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले होते. काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानं त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. कारण येत्या काही दिवसांमध्येच अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये काँग्रेसची कामगिरी कशी राहणार, निवडणुकांच्या दृष्टीनं खर्गे नेमकं कसं नियोजन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकार झोपले आहे, पण CBI,ED 24 तास काम करतायेत
भारतात भूक, प्रदूषण वाढत आहे, तसेच रुपया देखील घसरत आहे. सरकार झोपले आहे, पण CBI, ED, IT 24 तास काम करत आहेत. नवीन भारतात गोडसेला देशभक्त आणि महात्मा गांधींना देशद्रोही म्हटले जात असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान आणायचे असल्याचा निशाणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला. नवा भारत घडवण्यासाठी त्यांना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. कारण त्यांना माहित आहे की जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ते करु शकत नाहीत. आम्ही ते होऊ देणार नाही आणि त्याविरोधात लढा देत राहू असेही खर्गे यावेळी म्हणाले.
24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेर काँग्रेसचं अध्यक्षपद
80 वर्षीय मल्लिकार्जून खर्गे हे कर्नाटकातील आहेत. त्यांनी 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी 66 वर्षीय थरुर यांचा पराभव केला होता. पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: