Himachal Pradesh Election 2022: भाजप-काँग्रेसचं काय आहे राजकीय गणित, जाणून घ्या
Himachal Pradesh Election 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येथे 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत होती.
Himachal Pradesh Election 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येथे 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत होती. मात्र 2022 मध्ये येथील राजकीय गणित बदलले आहे. यावेळी या दोन्ही पक्षांना आम आदमी पक्षाचेही आव्हान असणार आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही या राज्यातील जनतेने 5-5 वर्षे संधी दिली आहे. येथे 1985 पासून दर 5 वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या अपेक्षा या ट्रेंडवर असताना भाजपसमोर पूर्वीची कामगिरी कायम ठेवण्याचे आव्हान आहे.
यंदा सत्ता बदल होणार, काँग्रेसला अपेक्षा
यंदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. तसेच काँग्रेस महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच काँग्रेसने दिवंगत नेते वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि माजी मंत्री बीडी बाली यांचे पुत्र रघुबीर बाली यांना तिकीट दिले आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार प्रतिभा सिंह हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाची धुरा सांभाळत आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या त्या महत्वाच्या नेत्या असून मतदारांना काँग्रेसच्या बाजूने वळवण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने निवडून आल्यास जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचे, 300 युनिट मोफत वीज, महिलांना 1500 रुपये प्रति महिना आणि सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. असं असलं तरी या सगळ्यात हिमाचल प्रदेशमध्ये अंतर्गत कलहाचा सामना करण्याचे आव्हानही काँग्रेससमोर आहे. यातच अनेक जुने नेते पक्ष सोडून गेले आहेत. दिवंगत ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचे नातू आश्रय शर्मा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन सिंग बबलू यांनीही काँग्रेस सोडली आहे.
भाजला मोदींचा सहारा
हिमाचल प्रदेशात मोदी लाटेचा फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामुळेच पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशचा तीनवेळा दौरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील जनतेचे आकर्षण राहिले असून त्याचा फायदा उठवण्याचा भाजपचा जोरदार प्रयत्न आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते सत्ता परिवर्तनाच्या ट्रेंडवर मात करण्याचे. प्रत्येक जागेसाठी पक्षाने विशेष रणनीती तयार केली आहे. यासाठी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2022 च्या महत्त्वामुळे भाजपने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे उपस्थित राहणार आहेत.