(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शशी थरुर आणि सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, हिसांचारासंबंधी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप
दिल्ली हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस नेता शशी थरुर (Shashi Tharoor) आणि राजदीप सरदेसाई व इतर पाच पत्रकारांवर देशद्रोहाचा (sedition) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर हिंसाचारासंबंधी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आलाय.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस नेता शशी थरुर यांच्यासमेत सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत आयोजित ट्रॅक्टर परेड दरम्यान हिंसाचार झाला होता. त्यासंबंधी खोटी माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून संबंधितांनी समाजात हिंसा पसरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयपीसी अंतर्गत त्यांच्यावर देषद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशी थरुर आणि इतर सहा पत्रकारांच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण झाल्याचं एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
Delhi Violence: लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावणाऱ्यांविरोधात देशद्रोह आणि UAPA अंतर्गत गुन्हा
नोएडाच्या एका स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लोकांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून दावा केला होता की लाल किल्ल्यावरील घेराव आणि ट्रॅक्टर परेड दरम्यान पोलीसांनी एका शेतकऱ्याला गोळी घालून ठार मारलं होतं असंही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
शशी थरुर यांच्यासोबत मृणाल पांडे, राजदीप सरदेसाई, विनोद जोसे, जफर आगा, परेश नाथ आणि अनंत नाथ या पत्रकारांवर देशद्रोहाचा आणि हिंसा भडकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पीटीआयने या वृत्ताची खातरजमा केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला मंजूरी देण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रॅन्च करत आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 22 गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी गाजीपूर बॉर्डरवर प्रदर्शन करत असलेल्या शेतकऱ्यांना ती जागा सोडण्यास सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या या आदेशाला विरोध दर्शवला आहे. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी जाहीर केलं आहे की ते आत्महत्या करतील पण आंदोलन स्थळ सोडणार नाहीत. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.