प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Malyali Actor Passed Away: मल्याळम चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना समोर आली आणि संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरली आहे. हरिमुरली या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. केरळमधील पय्यन्नूर (Payyannur) येथील राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळून आला. अवघ्या 27 वर्षांच्या वयात त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिमुरलीचा मृतदेह सध्या बेबी मेमोरियल हॉस्पिटल (Baby Memorial Hospital) येथील शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत असून, नेमक्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बालकलाकार म्हणून 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम
हरिमुरलीने लहानपणीच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. बालकलाकार म्हणून त्याने जवळपास 50 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. रसीकन, अन्नन थम्पी, मादम्बी, डॉन, पट्टनथील भूतम अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांत त्याने बालभूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.
दिग्गज कलाकारांसोबत झळकला
हरिमुरलीने मल्याळम चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांसोबतही काम केले होते. सुपरस्टार मममुथी यांच्या अन्नन थम्पी या चित्रपटात तो दिसला होता. तसेच अभिनेता दिलीप यांच्यासोबत रसिकन या चित्रपटातही त्याने भूमिका केलेली. नंतरच्या काळात हरिमुरली अभिनयाबरोबरच चित्रपटसृष्टीत VFX आर्टिस्ट म्हणूनही त्यानं काम केलं. अमर अकबर अँथनी या चित्रपटातही तो झळकला होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
थक्काली श्रीनिवासन यांचं निधन
तामिळ सिनेसृ्ष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. तामिळ सिनेमातील प्रसिद्ध कलाकार थक्काली श्रीनिवासन यांचं निधन झालं आहे. ते दक्षिण भारतातील उत्तम कलाकारांपैकी एक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अॅक्टिंग, म्युझिक आणि दिग्दर्शनात आपली छाप सोडली आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपट प्रॉड्यूस देखील केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. दीर्घ आजाराने बंगळुरू येथे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती आहे. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.





















