Congress Meeting : सोनिया गांधींनी बोलावली काँग्रेसच्या महासचिव आणि राज्य प्रभारींची बैठक
26 मार्चला दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व महासचिव आणि राज्य प्रभारींची बैठक बोलावली आहे.
Congress Meeting : काँग्रेसच्या सर्व महासचिव आणि राज्य प्रभारींची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठक बोलावली आहे. 26 मार्चला दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ही बैठक होणार आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि काँग्रेस पक्षाच्या भविष्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. पाच राज्यापैकी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होतची. मात्र, तिथे यावेळी आम आदमी पार्टीने मुसंडी मारत काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली आहे. तर इतर उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातही काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. त्यामुळं या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या अनुशंगाने देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
G-23 नेत्यांची बैठक
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील जी-23 (G-23) नेत्यांमध्ये देखील महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत पाच राज्यात लागलेल्या निकालांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच काँग्रेस नेतृत्व बदलाची मागणीवरही चर्चा झाली होती. पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या G-23 नेत्यांनी बोलावलेल्या बैठकीला विविध नेते उपस्थित होते. काँग्रेसच्या G-23 नेत्यांच्या गटात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि भूपिंदर सिंग हुडा यांचा समावेश आहे.
पाच राज्यांच्या निराशाजनक निकालानं काँग्रेस पूर्णपणे हादरुन गेली आहे. निकालानंतर यूपी, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या पाचही राज्यातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे तातडीनं घेतले गेले. त्यात आता जी 23 गटाच्या विरोधाची धारही वाढत चालली आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडी काँग्रेसला कुठे घेऊन जाणार, काँग्रेसमध्ये काही बदल होणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: