Mallikarjun Kharge : काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मल्लिकार्जुन खरगे, काय काय आव्हानं आहेत नव्या अध्यक्षांसमोर
Congress New President: मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष तर झाले, पण हायकमांड म्हणून गांधी कुटुंबाच्या प्रभावातून किती बाहेर येतात, किती स्वतंत्र कार्यशैली ठेवतात हे पाहावं लागेल.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) विरुद्ध थरुर या लढाईत मल्लिकार्जुन खरगे यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर काही आव्हानं असणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून ज्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या प्रतीक्षेत काँग्रेस होती, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. मल्लिकार्जुन खरगे आता काँग्रेसचे नवे अध्यक्ष असणार आहेत. 24 वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला मिळाला आहे. सीताराम केसरी यांच्यानंतर पहिल्यांदाच हे पद गांधी कुटुंबाहेर गेलं आहे. अर्थात केसरींच्या काळात गांधी कुटुंबाचा रिमोट कंट्रोल सक्रिय नव्हता. आता मात्र तो किती सक्रिय असणार याची उत्सुकता असेल.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान पार पडलं. तब्बल 22 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी ही निवडणूक पार पडत होती. त्यामध्ये एकूण 9,385 मतदान झालं. काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांना 7,897 मतं मिळाली, तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली. 416 मतं अवैध ठरली आहेत.
नरसिंह राव यांच्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष दक्षिण भारतातला असणार आहे. मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकचे आहेत. दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव असलेलं हे एकमेव राज्य. त्यामुळे भाजपला दक्षिणेत जाण्यापासून रोखण्याचं पहिलं आव्हान त्यांच्यापुढे असेल.
मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिली परीक्षा आहे हिमाचल प्रदेश, गुजरातमधे. एक राज्य भाजप अध्यक्ष नड्डांचं, तर दुसरं मोदी शाहांचं. पाठोपाठ लोकसभा निवडणुकाही तोंडावर आहेतच.
नव्या काँग्रेस अध्यक्षांसमोरची आव्हानं
1. सध्या देशात राजस्थान, छत्तीसगढ या दोन राज्यांत काँग्रेसचे मुख्यमंत्री.
2. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी कर्नाटक, हिमाचल, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये निवडणुका होणार आहेत.
3. 2024 साठी काँग्रेस पक्षाला बळकट करायचं असेल तर या राज्यांमधली स्थिती सुधारावी लागेल.
4. खरगे अध्यक्ष तर आहेत, पण हायकमांड म्हणून गांधी कुटुंबाच्या प्रभावातून किती बाहेर येतात, किती स्वतंत्र कार्यशैली ठेवतात हे पाहावं लागेल.
5. राहुल गांधींची टीम, प्रियंका गांधींची टीम पक्षात आहे. खरगेंचं त्यांच्याशी समीकरण कसं राहतं हे पाहणं महत्वाचं असेल.
6. खरगे 80 वर्षांचे आहेत, लोकसभा निवडणुकीआधी वादळी दौरे करण्यात ते किती सक्षम ठरतात हेही पाहावं लागेल
निवडणूक तर झाली, पण ती जाहीर झाल्यापासूनच खरगे हे गांधी घराण्याचा अघोषित पाठिंबा असलेले उमेदवार म्हणून पाहिले जात होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला भाजपचे अध्यक्ष नड्डा तर काँग्रेसचे खरगे असतील. पण दोन्ही पक्षात त्यांच्या नेत्यांचाच प्रभाव अधिक आहे. त्यामुळे या लढाईला पुन्हा मोदी विरुद्ध राहुल गांधी असंच स्वरुप प्राप्त होतं का हेही पाहावं लागेल.