Women's Reservation Bill : या निवडणुकीपासून महिला आरक्षण ओबीसी कोट्यासह लागू करा; राहुल गांधींची मागणी
Rahul Gandhi Women's Reservation Bill : ओबीसी कोट्यासह महिला आरक्षण विधेयक आगामी निवडणुकीपासून लागू करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
नवी दिल्ली : लोकसभेत सादर करण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावरील (Women's Reservation Bill) चर्चेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सहभाग घेतला. महिला आरक्षण विधेयक हा बदल घडवून आणणारा असल्याचे त्यांनी म्हटले. महिला आरक्षणासाठी पुढील जनगणनेची प्रतीक्षा कशाला, तर याच निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी करताना त्यांनी ओबीसी कोट्याची मागणी केली.
लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, सरकारने मांडलेले महिला आरक्षण विधेयक अपूर्ण आहे. ओबीसी महिलांसाठी आरक्षणाची तरतूद नाही. देशाच्या विकासात इतर मागासवर्गीयांचा मोठा वाटा आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव असलेले विधेयक तातडीने लागू करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली. जनगणना आणि मतदारसंघाची पुनर्रचनेची प्रतीक्षा कशाला, असा थेट प्रश्न त्यांनी केला.
ओबीसींच्या मुद्यावर जोर
राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात ओबीसी मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. ओबीसी कोट्याशिवाय असलेले हे विधेयक अपूर्ण असून ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.
राहुल यांनी म्हटले की, सरकार अनेक मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करते. यातील एक मुद्दा जात जनगणना आहे. विरोधी पक्षाने जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करताच भाजप अचानक इतर मुद्दे आणून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ओबीसी समाज आणि भारतातील लोक दुसरीकडे पाहू लागतील याचे कारण मला समजत नसल्याचे त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारमधील 90 सचिवांपैकी केवळ 3 ओबीसी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. विविध संस्थांमधील ओबीसींच्या टक्केवारीबाबत संशोधन करण्यात आले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, पण केंद्र सरकारमधील 90 सचिवांपैकी केवळ 3 ओबीसी समाजातील आहेत. ते भारताच्या बजेटच्या पाच टक्के नियंत्रित करत असल्याचे त्यांनी म्हटले.
There is one thing in my view that makes this bill incomplete. I would have liked to see OBC reservation included in this bill. I think it's very important that a large chunk of Indian women should have access to this reservation, and that is missing in this bill.
— Congress (@INCIndia) September 20, 2023
There are also… pic.twitter.com/IP0KROB6ZR
भाजप खासदारांना राहुल म्हणाले डरो मत...
ओबीसींच्या प्रमाणावरून राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर भाजप खासदारांनी त्यामध्ये अडथळे आणले. त्यावर राहुल गांधी यांनी भाजप खासदारांना उद्देशून डरो मत... असे म्हटले. ओबीसींच्या प्रतिनिधीत्वाबाबत बोलत असताना तु्म्ही गोंधळ का घालता...तुम्ही ओबीसींविरोधात आहात का, असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला.