(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचं निधन
जयपाल रेड्डी चार वेळा आमदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच दोन वेळा ते राज्यसभेचे सदस्यही होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते कॅबिनेट मंत्री होते.
हैदराबाद : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते निमोनिया आजाराने त्रस्त होते. त्यांना गेल्या आठवड्यात उपचारासाठी दिल्लीच्या एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्री
जयपाल रेड्डी चार वेळा आमदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच दोन वेळा ते राज्यसभेचे सदस्यही होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते कॅबिनेट मंत्री होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मंत्री होते. त्याआधी 1998 च्या पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते.
आणीबाणीच्या काळात त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जनता पार्टीत सामील झाले होते. त्यानंतर 1999 ला जवळपास 21 वर्षांनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये वापसी केली. त्यानंतर यूपीएच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.
काँग्रेसकडून ट्विटरवरून श्रद्धांजली
माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या निधनाची बातमी ऐकून आम्ही दु:खी आहोत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पाच वेळा लोकसभा, दोन वेळा राज्यसभा खासदार, चार वेळा आमदार म्हणून त्यांनी काम केलं. या दु:खद क्षणी त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रपरिवाराला ताकद मिळो, असं ट्वीट काँग्रेसने केलं आहे.
We are saddened to hear of the passing of former Union Minister Jaipal Reddy. A senior Congress leader, he served as an LS MP 5 times, an RS MP 2 times and as an MLA 4 times. We hope his family and friends find strength in their time of grief. pic.twitter.com/3BHVc07OYA
— Congress (@INCIndia) July 28, 2019