Rahul Gandhi : काँग्रेस सत्तेत आल्यास राहुल गांधी 100 टक्के पंतप्रधानपदाचे दावेदार, राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या नेत्यानं कारणं सांगितली...
Rahul Gandhi : काँग्रेसनं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची कामगिरी सुधारली होती. काँग्रेसची सत्ता आल्यास ते पंतप्रधान होतील, असं काँग्रेसच्या बड्या नेत्यानं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि नुकतेच तेलंगणा राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेल्या अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhavi) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सिंघवी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं कौतक केलं. यावेळी ते म्हणाले की राहुलगांधी गांभीर्यानं अनेक मुद्यांवर काम करत असून त्यांचं समर्पण पाहायला मिळतं. काँग्रेसचं सरकार ज्यावेळी स्थापन होईल तेव्हा राहुल गांधी पंतप्रधानपदाचे शंभर टक्के दावेदार असतील, असं सिंघवी म्हणाले.
अभिषेक मनू सिंघवी पुढं म्हणाले की राहुल गांधी जे बोलतात आणि करतात त्यात फरक नाही. जे लोक राहुल गांधी यांची चेष्टा करायचे त्यांना देखील आता धक्का बसलेला आहे. राहुल गांधी एखाद्या गोष्टीबाबत दुहेरी भूमिका घेत नाहीत, ते मुद्यांवर बोलतात, असंही त्यांनी म्हटलं.
अभिषेक मनू सिंघवी पुढं म्हणाले की राहुल गांधी यांचं गांभीर्य प्रत्येक घटकाला समजलं आहे. राहुल गांधी ज्या गोष्टी बोलतात तेच करतात, असा विश्वास लोकांना पटला असल्याचं सिंघवी म्हणाले. राहुल गांधी यांनी गांभीर्य आणि सन्मान कमावला असल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस सत्तेत आली तर त्यांना नजरअंदाज करता येईल का? राहुल गांधी भविष्यातील पंतप्रधान आहेत का? असं विचारलं असता त्यांनी काँग्रेस जेव्हा सत्तेत येईल तेव्हा ते 100 टक्के दावेदार असतील, असं अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.
लोकसभेत आपल्याला जवळपास 10 वर्षानंतर विरोधी पक्षनेता पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 99 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसकडे गेल्या दोन निवडणुकांमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतकेही खासदार नव्हते. भारतात विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी लोकसभेत किमान 55 खासदार असणं आवश्यक असतं.राहुल गांधी सध्या रायबरेलीचे खासदार म्हणून काम करत आहेत. राहुल गांधी यंदाच्या निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यापैकी त्यांनी वायनाडचा राजीनामा दिला होता. तर, यापूर्वी राहुल गांधी तीन वेळा अमेठी आणि एकदा वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी गेल्या दोन वर्षात भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा या दोन्ही यात्रा काढल्या होत्या. गेल्या दोन वर्षांमध्ये काँग्रेसनं हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सत्ता मिळवली. तर, राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता गमवावी लागली होती.
इतर बातम्या :
कुणी बोललं म्हणून अंगाला भोकं पडत नाहीत; सुप्रियाताईंच्या टीकेवर अजित दादांचा बारामतीतून पलटवार