'भारत बचाओ', मोदी सरकारविरोधात काँग्रेसचं रामलीला मैदानात आंदोलन
रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. रामलीला आणि दिल्लीत सर्वत्र काँग्रेसचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. मोदी सरकारविरोधात शनिवारी दुपारी काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजताची या आंदोलनाची वेळ आहे.
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेस मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. यासाठी काँग्रेसकडून आज दिल्लीतील रामलीला मैदानात 'भारत बचाओ' रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसची रॅली यशस्वी करण्यासाठी देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रामलीला मैदानात एकत्र जमत आहेत. या रॅलीमध्ये 'मोदी है तो मंदी है'चा नारा दिला जाणार आहे. अशा घोषणा असलेल्या टी-शर्ट्सचं वाटप कार्यकर्त्यांना करण्यात येत.
रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. रामलीला आणि दिल्लीत सर्वत्र काँग्रेसचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. एकप्रकारची वातावरण निर्मिती काँग्रेसकडून केली जात आहे. रामलीला मैदानात काँग्रेसचे झेंडे आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टर्सवर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो दिसत आहेत.
मोदी सरकारविरोधात शनिवारी दुपारी काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजताची या आंदोलनाची वेळ आहे. या रॅलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व सदस्य सकाळी 11.15 वाजता रामलीला मैदानात पोहोचणार आहेत.
काँग्रेसच्या या रॅलीसाठी रामलीला मैदानात तीन मंच उभारण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या मंचावर सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यासारखे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. तर मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला उभारलेल्या मंचावर काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व सदस्य, मुख्यमंत्री, पक्षाचे महासचिव, प्रभारी यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील.
तिसऱ्या मंचावर कोणत्याही नेत्यांचे फोटो दिसत नाहीत. मात्र रामलीला मैदानात राहुल गांधी यांचा मोठा कटआऊट लावण्यात आला आहे. याशिवाय सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांचे छोटे कटआऊटही लावण्यात आले आहेत.