Lockdown | तेलंगणामध्ये लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवला!
देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी 29 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राज्यात लॉकडाऊन वाढवणारं तेलंगणा हे पहिलचं राज्य ठरलं आहे.
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी (5 मे) राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी 29 मे पर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. देशभरात सध्या 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आपल्या राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवणारं तेलंगणा हे पहिलचं राज्य ठरलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, "राज्यात सात वाजल्यापासून संचारबंदी लागू केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी सहा वाजेपर्यंत आवश्यक वस्तू खरेदी करुन घरी जावं." तेलंगणा सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी दिवसात केंद्र सरकारही लॉकडाऊनची मर्यादा वाढवू शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे.
तेलंगणाच्या केसीआर सरकारने मंगळवारी संध्याकाळी या संदर्भात सविस्तर नियमावली जारी करुन लॉकडाऊनच्या अटींचा उल्लेख केला आहे. सरकारने म्हटलं आहे की, "ज्यांना गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी त्या खरेदी करुन सहा वाजेपर्यंत घरी परतावं." "याशिवाय कोणीही लॉकडाऊनचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
दरम्यान तेलंगणा देशातील पहिलं असं राज्य होतं जिथे जनता कर्फ्यूनंतरही राज्यात कर्फ्यू कायम ठेवण्याचा आदेश जारी केला होता. याशिवाय संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पूर्णत: सूट दिली होती.
तेलंगणामध्ये 1000 पेक्षा जास्त कोरोनाबाधित तेलंगणामध्ये सध्या कोरोनाचे एकूण 1096 रुग्ण आहेत. मंगळवारी राज्यात 11 नवे रुग्ण आढळले. तेलंगणाचे 21 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 25 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या 628 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दारुची 2200 दुकानं खुली होणार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं की, "कन्टेंन्मेंट झोनमधील 15 दुकानं वगळता दारुची 2200 दुकानं सुरु राहतील. दारुच्या दरात 16 टक्क्यांनी वाढ होईल. तर देशी दारुच्या किंमती 11 टक्क्यांनी वाढवल्या जातील. सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल. मास्क लावल्याशिवाय दारु किंवा इतर वस्तू मिळणार नाहीत."
गाझियाबादमध्येही 31 मे पर्यंत लॉकडाऊन दरम्यान तेलंगणाच्या आधी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातही लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाझियाबाद जिल्हाधिकारी अजय शंकर पांडेय यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात 31 मे 2020 पर्यंत राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि खेळाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार नाही. याशिवाय सभा, मोर्चे, मिरवणुका यांसारख्या कार्यक्रमावरही बंदी असेल. सामान्यांसाठी धार्मिक स्थळं बंद असतील. सोबतच लोकांच्या एकत्र येणाऱ्यावर बंदी असेल. लग्नसोहळा किंवा अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल.